Viral school video: मुंबईतील ‘स्कॉलर्स एज्युकेअर’ या शाळेने अलीकडेच मोबाईल व्यसनावर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक अनोखा प्रयोग राबवला. लहान मुलांमध्ये वाढत्या मोबाईल वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने केलेला हा उपक्रम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. मात्र, काही पालक आणि नेटिझन्सनी या प्रयोगातील भीतीदायक दृश्यांवर आक्षेप घेत, लहान विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या व्हिडीओमध्ये शिक्षक मोबाईल फोनच्या अतिवापराचे शारीरिक आणि मानसिक परिणाम नाट्यमयपणे मांडतात. हा व्हिडीओ शाळेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता आणि त्याला ‘तंत्रज्ञान आणि वास्तविक जीवनातील नातेसंबंधांमध्ये संतुलन साधण्याचा संदेश’ अशी कॅप्शन देण्यात आली होती.
पाहा व्हिडिओ
सादरीकरणात तीन शिक्षक सहभागी झाले होते – एका शिक्षकाने ‘विद्यार्थ्याची’ भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तो सतत त्याच्या मोबाईल फोनवर स्क्रोल करत होता, त्याच्या जेवणाकडे दुर्लक्ष करत होता आणि त्याचा फोन काढून घेतल्यावर तो चिडचिड करत होता. तिसरा शिक्षक, ‘पालक’ म्हणून, मुलाला गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, तर तिसरा शिक्षक, ‘डॉक्टर’ म्हणून तपासणी करतो. शेवटी नाटक अधिकच नाट्यमय बनते. डॉक्टर इंजेक्शन देतात आणि नंतर मुलाच्या डोळ्यांतून खोटे रक्त वाहत असल्याचे दाखवले जाते, जे मोबाईलच्या व्यसनाचे गंभीर परिणाम दर्शवते.
या दृश्यांमुळे वर्गातील काही लहान विद्यार्थी घाबरले आणि रडू लागले, असे व्हिडीओत दिसून आले. शिक्षकांनी जेव्हा विद्यार्थ्यांना विचारले की, आता ते मोबाईल वापरतील का, तेव्हा अनेकांनी नकार दिला. या नाट्याचा शेवट ‘नो मोअर फोन्स, प्लीज’ या गंभीर संदेशाने झाला.
नेटिझन्सनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी शाळेच्या प्रयत्नाचे कौतुक करीत “खूप छान” आणि “नाइस वर्क अँड क्यूट” अशा प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी “न्यू जनरेशन रिक्वायर्स न्यू सोल्यूशन्स” असे म्हणत हा प्रयोग योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे म्हटले. मात्र, काहींनी लहान मुलांना अशा भीतीदायक दृश्यांद्वारे संदेश देणे योग्य नसल्याचेही मत व्यक्त केले.या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की, लहान वयात मोबाईल व्यसन रोखण्यासाठी कोणत्या प्रकारची जागरूकता आवश्यक आहे भीतीद्वारे की संवादाद्वारे?