Viral Video Fake Police Officer Caught At Garba: गुजरात हे राज्य आपल्या नवरात्र उत्सवासाठी ओळखले जाते. या सणात लोक गरबा आणि दांडिया नृत्य करतात. सूरतसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात मंडप उभारून असे गरब्याचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात व्हीआयपी पाहुणे आणि राजकीय नेतेही येतात.अशातच २५ सप्टेंबरला गुजरातच्या सूरतमधून एक घटना समोर आली आहे, जी नवरात्र उत्सवातील गरबा कार्यक्रमांच्या आयोजकांसाठी चिंताजनक ठरली आहे. सूरत शहरातील डुमास पोलिस ठाणे परिसरात, गरबा कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने डुप्लिकेट पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याचे भासवून हातात वॉकी-टॉकी घेऊन मंडपाच्या व्हीआयपी गेटमधून प्रवेश केला. आरोपीने पोलिस अधिकारी असल्याचा अभास करून व्हीआयपी गेटमधून प्रवेश करताना बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरोपीचे नाव युवराज राठोड असून तो हिऱ्यांचा कारागीर आहे. युवराज राठोडने पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून कार्यक्रमस्थळी मोफत प्रवेश मिळवला. वृत्तानुसार, राठोड गेल्या दोन दिवसांपासून पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात गरबा कार्यक्रमात उपस्थित होता आणि पैसे न देता उत्सवाचा आनंद घेत होता. एवढेच नव्हे तर असेही वृत्त आहे की, युवराज राठोड याने कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांसोबत फोटो काढले. खरा पोलिस अधिकारी असल्याचे सांगून तो आत्मविश्वासाने कार्यक्रमस्थळी फिरत होता.

व्हिडीओ पाहा

पण, त्याच्या संशयास्पद वागण्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिस अधिकारी आणि आयोजकांना शंका आली. मग त्यांनी त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. लक्ष ठेवल्यानंतर पोलिसांनी त्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ अटक केली. चौकशीदरम्यान राठोडने सांगितले की, वॉकी-टॉकी त्याच्या मित्राचा होता. त्याला पोलिस अधिकारी बनण्याची आवड होती आणि पोलिस असण्यामुळे मिळणारा अधिकार अनुभवायचा होता.

पोलिसांनी आरोपीचा आधी आणि नंतरचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना पोलिसांनी गुजराती भाषेत म्हटले आहे की, “अधिकारी आणि राजकारण्यांसोबत फोटो काढून, पासशिवाय गरबा कार्यक्रमात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला सूरत शहरातील डुमास पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यामुळे कायद्याची जाणीव झाली.”

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला असून राठोडने पूर्वीदेखील खोटा पोलिस बनून कोणावर फसवणूक किंवा अन्य गैरव्यवहार केले आहेत का याबद्दल जाणून घेतले. पोलिसांनी नागरिकांना कायद्याची जाणीव करून दिली आणि अशा प्रकारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन हे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अत्यंत आवश्यक आहे; असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे नवरात्र उत्सवात आयोजक आणि नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.