Viral Video Family Celebrates Daughters First Period : मासिक पाळी प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अगदी नाजूक क्षण असतो. पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. त्याच सुमारास मुलींना मासिक पाळी (Menstruation) यायला सुरुवात होते. वयात आल्यावर योनीमार्गे दर महिन्याला रक्तस्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी, असे म्हटले जाते. या कालावधीत प्रचंड चिडचिड, थकवा, अंग दुखणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी स्त्रियांना चार दिवस सगळ्या कामांपासून आराम दिला जायचा. पण, जसजसा काळ बदलत चालला आहे, तसतसं जुन्या परंपरांना पूर्णविराम द्यायला सुरुवात झाली आहे.
जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा तिच्यासाठी तो क्षण खूप वेगळा असतो. तो क्षण तिच्या लक्षात राहण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील कुटुंबानं अनोखी गोष्ट केली आहे. लेकीला दरवाजात उभं करून, तिच्यासमोर चादर पकडून ठेवली आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबातील प्रत्येक जण लेकीच्या पायाजवळ पैसे ठेवून, डोकं ठेवून तिच्या पाया पडताना दिसत आहेत. त्यानंतर चादर काढताच बाबा लेकीला मिठी मारतो आणि लेक कुटुंबाच्या या सुंदर कृतीनं अगदी भारावून जाते आणि रडू लागते.
“याला म्हणतात कुटुंब…” (Viral Video)
ही प्रथा आहे की तिचे खास स्वागत याबद्दल कल्पना नाही. पण, हा लेकीला आयुष्यभर लक्षात राहील, असा सुंदर क्षण आहे एवढे नक्की. आताच्या काळात मासिक पाळीबद्दल शाळेत आवर्जून सांगितले जाते. पण, पूर्वी याबद्दल एवढे प्रशिक्षण कुठे दिले जात नव्हते. त्यामुळे त्या वेळी जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी यायची तेव्हा तिच्यासाठी तो क्षण खूप वेगळा ठरायचा. आपल्याला नक्की काय झालंय, नक्की रक्तस्राव का होतोय, असे अनेक प्रश्न तिला पडायचे. त्यामुळे व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुमच्या घरातील वा भविष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीला मासिक पाळी आल्यानंतर असेच काहीसे स्वागत व्हायला पाहिजे, असे तुमच्याही मनात येईल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @its_aayushaaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तुमचे कुटुंब मुलींची पहिली मासिक पाळी अशा प्रकारे साजरी करते?’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “व्हिडीओ पाहून एकच आशय व्यक्त करताहेत की, “शिका”, “प्रत्येक मुलीला असेच वागवले पाहिजे”, “याला म्हणतात श्रीमंत कुटुंब” आदी कमेंट्स करीत आहेत. तर, अनेक मुली त्यांच्या पहिल्या मासिक पाळीची आठवण कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत.