Viral Video Heartfelt Welcomes At Home : सुखी संसाराची तोडूनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट… असे म्हणत अनेक वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. तहान-भूक विसरून, ऊन-पावसाची चिंता न करता, अनेक जण या वारीचा आनंद लुटतात. पण, हीच मंडळी जेव्हा वारीवरून घरी येतात तेव्हा त्यांचे खास पद्धतीने स्वागत केले जाते. अनेकदा त्यांच्या पाया पडून जणू काही पांडुरंग घरी आला, असेच समजले जाते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये लेकीने वारीहून आलेल्या बाबांसाठी काहीतरी खास केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या आणि पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांचे बाबा वारीहून घरी आले आहेत. वारीतून घरी आलेल्या बाबांचे खास स्वागत करण्यासाठी निर्मला यांनी त्यांना आधी सोफ्यावर बसवले, त्यांचे पाय पाण्याने धुतले आणि स्वच्छ केले. एवढेच नाही, तर पायांना हळद-कुंकू लावून, त्यावर फुले वाहिली. नंतर मग बाबांचे औक्षण करून, त्यांना फूल दिले. अशा पद्धतीने लेकीने वडिलांचे खास स्वागत केल्याचे दिसते आहे.
पाय जड झालेत पण मन मात्र… (Viral Video)
तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, सर्वप्रथम पाय धुऊन, त्यांना हळद-कुंकू आणि फूल वाहून लेकीने बाबांचे खास स्वागत केले. मग नंतर व्हिडीओ पोस्ट करीत लेकीने बाबांसाठी ‘पांडुरंगाच्या दर्शनाने परतले आमचे बाबा… वारी ही श्रद्धेची, भक्तीची आणि आत्मिक समाधानाची यात्रा असते. माझे वडील पंढरपूर वारी करून आज घरी परतले… थकवा असेल; पण चेहऱ्यावर समाधान आहे, पाय जड झालेत; पण मन मात्र हलकं झालंय! पांडुरंगाच्या दर्शनानं त्यांचं मन भरून आलं आणि आमचं घर पुन्हा भक्तीमय झालं. पांडुरंग विठ्ठल… पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’, अशी कॅप्शन दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nirmala_shubham_nawale या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा खुश झाले आहेत आणि “संस्कार असे पाहिजेत. खूप सुंदर ताई. राम कृष्ण हरी”, “धन्य तो बाप, ज्याला तुमच्यासारखी मुलगी मिळाली”, “ताईसाहेब लई छान. सदैव तुमच्यावर पांडुरंगाची कृपा राहो. राम कृष्ण हरी”, “बाप नावाचा विठ्ठल पाठीशी असला की आयुष्यात पंढरपूर सहज गाठता येते” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.