Viral Video Stop Comparing and Start Living : अरे तिचे केस किती मस्त आहेत, अरे तिची उंची किती भारी आहे, मला पण याच्यासारखं शर्ट घ्यायचं आहे, शूज घ्यायचे आहेत असे आपण अगदी दररोज बोलतच असतो. पण, समोरच्यापेक्षा कितीतरी सुंदर गोष्टी, प्रेमळ माणसे आपल्याकडे असतात; हे आपण अनेकदा विसरूनच जातो. पण, रस्त्याकडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतेही घर-दार नसणारी मंडळी मात्र जे आहे त्यांच्याकडे त्यातच सुख मानतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ नेहरूळ स्टेशनचा आहे असे सांगितले जाते आहे. इन्स्टाग्राम युजरचे @nidhs_647 ट्रेन प्रवासादरम्यान स्टेशनवर राहणाऱ्या एका मुलीकडे लक्ष गेले. ती मुलगी पायात पांढऱ्या रंगाचे क्रॉक्स घालून उड्या मारताना दिसते आहे. कदाचित तिच्याकडे पायात घालायला चप्पलच नसते. त्यामुळे पायात एखादी चप्पल घालायला मिळाली आहे याचा आनंदच तिच्यासाठी लाखमोलाचा असतो. ते म्हणतात ना आयुष्य सुंदर आहे, फक्त ते जसे वाट्याला येते तसे स्वीकारायला शिका आणि आयुष्याचा आनंद घ्या; तसेच काहीतरी या मुलीकडे बघून आपल्याला धडा मिळतो आहे.

स्वीकारायला शिका आणि आयुष्याचा आनंद घ्या (Viral Video)

आयुष्य आनंदाने जगायची इच्छा असते. पण, आपण स्वतःची इतरांबरोबर तुलना करून त्यांचा सगळंच संपवून टाकतो. आपल्याप्रमाणेच इतरही जगण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि घरखर्च भागवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळे स्वतःची इतरांबरोबर तुलना करणे चुकीचे आहे. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहून आपण आपलं आयुष्य आनंदात कसे जगू शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nidhs_647 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “कधी कधी आपण दुसऱ्यांचे जीवन बघून तसंच मिळवण्याच्या धावपळीत इतके गुंतून जातो की, आपलं स्वतःचं आयुष्य किती सुंदर आहे हे आपण अनेकदा विसरून जातो. आज जे काही तुझ्याकडे आहे, त्यासाठी कोणीतरी मनापासून प्रार्थना करत आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.