वय हे फक्त एक आकडा आहे हे सिद्ध करणारा एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हरियाणातील ८० वर्षांच्या एका आजोबांनी १५,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून दाखवलं आणि त्यांचा हा धाडसी पराक्रम हजारो लोकांना प्रेरणा देत आहे. आयुष्यातील उत्साह, जोश आणि ‘काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न’ करण्याचे स्वप्न वयाच्या पलीकडेही टिकून राहते याचा हा जिवंत पुरावा आहे.

हा व्हिडीओ आजोबांच्या स्कायडायव्हिंग अनुभवावर आधारित असून, त्यांचा नातू अंकितसोबतचा हा रोमांचक क्षण कैद करण्यात आला आहे. अंकित आपल्या आजोबांसोबत सतत मजेदार आणि प्रेरणादायी कंटेंट बनवत असतो आणि त्यांचे अनेक व्हिडीओ आधीही व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी तर आजोबांनी थेट आकाशात झेप घेत सोशल मीडियावर नवा इतिहास रचला आहे.

व्हिडीओची सुरुवात विमानात बसण्यापूर्वीच्या एका छोट्या व्हिडीओने होते, जिथे आजोबा एकदम ठाम आवाजात म्हणतात, “हम हरियाणासे हैं, हम डरते नहीं।” त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा थोडा ही लवलेष नाही, उलट एक निखळ उत्साह आणि साहसाचे तेजस्वी भाव दिसतात.

त्यानंतरचे दृश्य म्हणजे, आजोबा एका व्यावसायिक डायव्हरसोबत विमानाच्या दारातून बाहेर पडतात आणि आकाशात मुक्तपणे भरारी घेतात. १५,००० फूट उंचीवरून खाली उतरतानाही, आजोबांचा चेहरा शांत, हसरा आणि आनंदाने चमकत राहतो. लँडिंग करताना ते अगदी सहजरीत्या पाय टेकवतात आणि आजूबाजूचे लोक त्यांचे अभिनंदन करतात.

पाहा व्हिडिओ

पाहणाऱ्यांना हा क्षण एकाचवेळी कौतुक, आश्चर्य आणि प्रेरणेची लहर देतो. अंकितने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओत तो सांगताना दिसतो की त्यांचे आजोबा कदाचित या उंचीवरून स्कायडायव्हिंग करणारे सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असू शकतात, यामुळे आजोबांचा हा पराक्रम अधिकच खास ठरतो.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहे. अनेकांनी आजोबांच्या धाडसाचं भरभरून कौतुक केलं. काहींनी लिहिलं, “हा खरा ताऊ ऑन टॉप आहे!” तर कुणी म्हणालं, “या वयात असं मनोधैर्य? सलाम!” एका युजरने मजेत लिहिलं, “हे जर ताऊ आज त्यांच्या तरुणपणात असते तर कल्पनाच करा!” अनेकांनी त्यांना “प्रेरणा”, “लिमिटलेस स्पिरिट”, “रॉकस्टार आजोबा” असे संबोधले.

लोकांनी या वयातही असा जोश टिकवून ठेवणाऱ्या आजोबांबद्दल प्रचंड आदर दाखवला. काहींनी तर आपल्या आई-वडिलांनाही असं नवीन जग अनुभवायला घेऊन जाण्याची प्रेरणा मिळाली असल्याचं सांगितलं.