Diwali viral video: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी (IIT Guwahati)मध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी घडलेला एक अनोखा व धक्कादायक प्रकार आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ‘रॉकेट आणि फटाक्यांचा संघर्ष’ असे नाव देण्यात आलेली ही घटना बराक आणि उमियम हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये घडली, ज्यामध्ये विद्यार्थी दिवाळीच्या उत्सवाचे साठे विसरून एकमेकांवर रॉकेट आणि फटाके फेकू लागले. या प्रकारामुळे कॉलेजच्या कॅम्पसवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विद्यार्थी हॉस्टेलच्या इमारतींमधून रॉकेट्स आणि फटाके एकमेकांकडे फोडताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे कॅम्पसवरील आकाश रॉकेट्सच्या प्रकाश आणि आवाजाने भरून गेला. सुरुवातीला हा प्रकार मजेशीर सण साजरा करण्याशी संबंधित होता; पण हळूहळू तो नियंत्रणाबाहेर गेला आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला. त्याचा आवाज खूप जास्त होता आणि हॉस्टेल एकमेकांच्या जवळ असल्यामुळे हा प्रसंग म्हणजे फटाके फोडण्याचा लढा वाटायला लागला.

सोशल मीडियावर व्हिडीओ पाहणाऱ्यांनी याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी ही बाब एक गंमत म्हणून घेतली आणि काहींनी या धोकादायक कृतीवर नाराजी व्यक्त केली. काही वापरकर्त्यांनी विनोद केला की, विद्यार्थ्यांनी “रॉकेट आणि क्षेपणास्त्रे कशी काम करतात याची चाचणी घेतली” किंवा “भौतिकशास्त्र आणि गणिताचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.” दुसरीकडे काहींनी या कृत्याला गंभीर संकट मानले आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी चिंता व्यक्त केली.

सोशल मीडियावर आलेल्या काही प्रतिक्रिया लक्षात घेण्यासारख्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “ते रॉकेट माझ्या खोलीत घुसले.” दुसऱ्याने म्हटले, “एसएबीने हे अधिकृतपणे आयोजित करावे!” तर एका युजरने लिहिले, “आमच्या काळात मानास आणि दीहिंग हॉस्टेलमध्ये असा फटाका लढा व्हायचा, खूप मजा यायची. अजूनही ही परंपरा सुरू आहे हे पाहून छान वाटलं.”तर दुसऱ्याने म्हटले, “माहितीय हे चुकीचं आहे; पण ते त्यांच्या जीवनाचा मजेशीर काळ एन्जॉय करीत आहेत.”

या घटनेमुळे केवळ सोशल मीडियावरच नव्हे, तर कॅम्पसच्या शिस्तीवर आणि विद्यार्थ्यांनी जबाबदारीने सण साजरा करण्यावरही मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून कोणीही जखमी किंवा नुकसान होऊ नये याची दक्षता घेतली. तरीही ती घटना कॉलेजच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करते. आयआयटी गुवाहाटीच्या प्रशासनाकडून अद्याप अधिकृत विधान आलेले नाही; पण हा प्रसंग आता ऑनलाइन ट्रेंडिंग विषय बनला आहे.