Viral Video Video Shows Passenger Locked Inside : ट्रेनमध्ये सीटवरून भांडण, टीटीईशी दंड भरण्यावरून वाद, जिकडे तिकडे टाकल्या गेलेल्या कचऱ्यामुळे झालेली ट्रेनच्या डब्याची दुर्दशा, जेवणाची अयोग्य सोय आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अस्वच्छ टॉयलेट (शौचकूप) आदी अनेक गोष्टींमुळे प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराज असतात. त्यामुळे काही प्रवासी अनेकदा संपूर्ण प्रवास संपेपर्यंत टॉयलेटकडे ढुंकूनही बघत नाहीत. पण, आज ट्रेनमधील अशी एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी कदाचित तुम्हालाही थक्क करून जाईल.
एका भारतीय रेल्वे प्रवासी सहा तासांहून अधिक काळ शौचालयात अडकून राहिला होता. त्यामुळे कर्मचारी आणि इतर प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. त्यामुळे तिथे रेल्वे कर्मचारी जाम झालेला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. सुरुवातीला अधिकारी आणि खान-पान सेवा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टॉयलेटचा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा ते दरवाजा उघडण्यात अयशस्वी ठरले, तेव्हा त्यांनी स्क्रूड्रायव्हर वापरून त्याचे ‘लॉक’ उघडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा तोही प्रयत्न अयशस्वी ठरला.
व्हिडीओचा शेवट आश्चर्यकारक (Viral Video)
पण, या घटनेला व्हिडीओच्या शेवटी एक आश्चर्यकारक वळण मिळाले, जेव्हा त्या माणसाने स्वतःला जाणूनबुजून आत कोंडून घेतल्याचे लक्षात आले. मग कर्मचाऱ्यांनी त्याला दरवाजा स्वतः उघडण्याची विनंती केली. काही क्षणांनंतर प्रवासी शेवटी टॉयलेटच्या बाहेर येतो. मग कर्मचाऱ्यांनी त्याचा फोटो, व्हिडीओ काढला आणि त्या प्रवाशाची चौकशी करण्यास सुरुवात केली. पण, त्याने स्वतःला का कोंडून ठेवले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ रेडिटच्या @Omarr_Paper / इंडियन रेल्वेज या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण, तो प्रवासी दारू पिऊन बाथरूममध्ये बेशुद्ध पडला असावा, तर काही जण असे म्हणत आहेत की, तो टीटीईपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लपून बसला असेल, असा अंदाज कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत. पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर भारतीय रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
