Viral Video Jewellery Shop Owner Hosts Dohale Jevan : आपण अनेकादा पाहिले असेल की, लग्नानंतर पहिल्यांदा स्त्री गरोदर राहिल्यानंतर सातव्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाला अनेकदा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना बोलावले जाते. झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट व पारंपरिक गाणी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. पण, आजचे डोहाळेजेवण जरा हटके आहे. कारण – आज घरी, हॉलमध्ये नाही तर चक्क दुकानात डोहाळेजेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
काही महिला गरोदर असतानाही अगदी ९ व्या महिन्यापर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा जिथे त्या काम करत असतील तिथे त्यांना विशेष सोय दिली जाते. कोणाला प्रवासात त्रास होईल म्हणून वर्क फ्रॉम होम तर कोणाला आरामात काम करण्यासाठी खास खुर्च्या उपलब्ध करून दिल्या जातात. पण, आज तर चक्क एका दागिन्यांच्या दुकान मालकाने त्यांच्या लाडक्या महिला कर्मचारीचे डोहाळेजेवण ठेवले आहे. सगळे कर्मचारी या खास कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून एकत्र जमले आहेत.
देव त्या दुकान मालकाचं भलं करो (Viral Video)
दागिन्यांच्या दुकानात वेगेवगेळ्या प्रकारचे ग्राहक येतात. त्यांच्याशी उभं राहून संवाद साधणे, दुकानातून एखादी गोष्ट त्यांनी विकत घेणे यासाठी प्रत्येक कर्मचारी धडपडत असतो. तर त्यातच गरोदर असतानाही आपली लाडकी महिला कर्मचारी दागिन्यांच्या दुकानात काम करतेय म्हंटल्यावर तिचे डोहाळेजेवण तर केलंच पाहिजे. ओटी भरण्यासाठी साडी, फळे, महिला कर्मचाऱ्याचे तोंड गोड करण्यासाठी मिठाई टेबलावर सजवून ठेवली आहे. एकेक करून महिला कर्मचारी येतात आणि हळद-कुंकू लावून, तिच्या हातात बांगड्या भरून, केसात गजरा माळून, डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम दुकानात सुरु आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून दुकान मालकाचे कौतुक करताना दिसत आहेत आणि “दुकानाच्या मालकासाठी एक लाईक तर मिळालाच पाहिजे”, “देव त्या दुकान मालकाचं भलं करो”, “आजपर्यंत कोणत्याच दुकान मालकाने असे अजिबात केलं नाही आहे”, “याच कारणामुळे दुकान मालकाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.