Viral Video Little Girl Falls Before Ramp Walk : आत्मविश्वास म्हणजेच स्वत:वरचा विश्वास हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. पण, काही जणांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते व ते स्वतःला कमी लेखू लागतात. म्हणूनच आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असते. पण, कधी कधी हा आत्मविश्वास आपल्यात जागा होण्यासाठी एका वाईट वा चांगल्या प्रसंगाची गरज असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
वेगवेगळ्या फॅशनवीकमध्ये मॉडेल रॅम्पवर वॉक करताना आपल्याला दिसतात. यादरम्यान मॉडेलचा नेकलेस तुटतो, चप्पल तुटते तर कधी ड्रेस फाटतो, तर कधी हिल्समुळे त्या स्टेजवर पडतात. यामुळे काही जण निराश होतात; तर काही जण त्या समस्येला अगदी विश्वासाने सामोरे जातात. तर आज एका चिमुकली बरोबर असेच काहीसे घडले आहे. एक चिमुकली रॅम्प वॉक करण्यासाठी शिड्यांवरून खाली उतरत येत असते. यादरम्यान तोल जाऊन ती खाली पडते. पण, हार न मानता ती जागेवरून उठते.
पडल्यानंतर सावरणे ही सर्वात मोठी कला आहे (Viral Video)
शिड्यांवरून पडल्यावर तिला नक्कीच लागले असणार असे व्हिडीओत दिसून येते आहे. एवढेच नाही तर स्पर्धा चालू असताना कोणीही तिची मदत करू शकलं नाही. चिमुकलीची मदत करण्यासाठी एक अज्ञात बाई सुद्धा तिथे येते. पण, चिमुकली मदत न घेता आत्मविश्वासाने रॅम्पवर वॉक करण्यास सुरुवात करते. हे पाहून उपस्थित सगळेच टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतात आणि हाच खरा आत्मविश्वास आहे असे म्हणतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @monika_saini1888 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “अडचणींना तोंड देणे हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही एक कला आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा चिमुकलीच्या आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक करताना दिसून आले आहेत आणि “पडल्यानंतर सावरणे ही सर्वात मोठी कला आहे”, “या व्हिडिओमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मागे उभे असलेले कोणीही हसले नाही, ती पडल्यावर त्यांना फक्त धक्का बसला” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.