Viral Video Man Steals Cash From Reception : रेल्वेस्थानक, ट्रेन, बाजारात, मॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत, अनेकांच्या खिशातून गुपचूप पाकीट काढण्यात चोर पारंगत असतात. पण, काही चोर मध्यरात्री घरात शिरून दागिने, पैसे चोरण्याचाही प्रयत्न करतात; तर काही जण सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याचे धाडस दाखवतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असो किंवा घरी किंवा आपण चालवतोय त्या दुकानातील सामानाची चोरी होऊ नये यासाठी आपल्याला विशेष लक्ष ठेवावे लागते. पाकीटमारांचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील; पण आज अशा एका चोराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे की, जो पाहून नेटकरी “तुझी वाट लागणार” असे कमेंटमध्ये म्हणताना दिसत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज १८ सप्टेंबर २०२५ चा आहे. एका आलिशान दुकानात दोन अनोळखी माणसं रिसेप्शनजवळ उभं राहून एका महिलेशी चर्चा करीत असतात. पण, यादरम्यान त्या दोन अनोळखी माणसांमधील एक जण रिसेप्शनवर ठेवलेल्या पूजेच्या ताटातून पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो. एक सुरक्षा रक्षकदेखील त्या दोघांच्या काही पावले मागे उभा असतो; पण त्याच्यासमोरच चोरी होत आहे याची जाणीव त्याला नसते. रिसेप्शनवर असणारी कर्मचारीसुद्धा कामात व्यग्र असते आणि त्यादरम्यान ते पूजेच्या ताटातील पैसे चोरून निघून जातात.
“सीसीटीव्ही होता म्हणून नाही तर…” (Viral Video)
दोन पुरुष एकत्र सलूनमध्ये येतात आणि पैसे घेऊन बाहेर पडताना दिसतात. एक माणूस रिसेप्शनवर असणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवतो आणि दुसरीकडे दुसरा माणूस पूजेच्या ताटातून हळूच पैसे लांबवण्यात यशस्वी ठरतो. एवढेच नाही, तर तो माणूस एवढ्या चलाखीने पूजेच्या ताटातील पैसे चोरतो की, मागे उभ्या असणाऱ्या सुरक्षा रक्षकालासुद्धा त्याचा थांगपत्ता लागत नाही. पण, त्याची ही हुशारी सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जर त्यांनी या प्रतिभेचा वापर काही चांगल्या कामांसाठी केला असता, तर भारत आज खूप चांगल्या स्थितीत असता”, “पूजेच्या ताटातील पैसे चोरतो आहेस, तुझी वाट लागणार”, “सीसीटीव्ही होता म्हणून नाही, तर त्याने ???आयफोन रांगेत उभ्या असलेल्या सामान्य व्यक्तीपेक्षा??? जास्त कमाई केली असती,” अशी मजेशीर कमेंट करीत एका युजरने गार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, ”ज्या गार्डला हे लक्षातही येत नाही, त्याचा उपयोगच काय, आजकाल लोक जबाबदारीने काम करीत नाहीत” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.