viral video Uber driver acts of kindness : ड्रायव्हर कितीही चांगला असला तरीही एकट्या स्त्रीला रात्रीचा प्रवास करताना मनात शंका येणे साहजिक असते. अनेकदा एकटं प्रवास करताना आपण सुखरूप पोहचू का, हा ड्रायव्हर गाडी चुकीच्या दिशेने तर घेऊन जाणार नाही ना असे अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचत असताना. पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही या सगळ्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरून जाल आणि सगळे सारखे नसतात असेही आवर्जून म्हणाल.

२०२३ पासून भारतात राहणारी पॉडकास्टर आणि कंटेंट क्रिएटर ब्री स्टीलने छठपूजेच्या उत्सवादरम्यानचा तिचा अनुभव शेअर केला आहे. यादरम्यान रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे १५ मिनिटांत पोहचणारी उबर जवळजवळ दोन तास उशिरा पोहचली. ट्रॅफिकमुळे ३० मिनिटे ही कॅब एका ठिकाणी थांबली होती. मग तिचा प्रवास आरामदायी करण्यासाठी चालकाने बाटलीबंद पाणी, कबाब विकत आणून दिले; जेणेकरून प्रवासात भूक, तहान लागणार नाही. पाणी आणि कबाबचे पैसे देण्याचा जेव्हा प्रवासी महिलेने प्रयत्न केला तेव्हा मात्र “तुम्ही आमचे पाहुणे आहात” ; अशा शब्दात चालकाने आपुलकी दाखवली.

याआधी सुद्धा एका कॅब चालकाने तिला पुराच्या पाण्यातून वेळेवर विमानतळावर पोहोचवले तर तिसऱ्याने माझा बूट रिक्षातून मला परत आणून दिला. याबद्दल स्वतःला लकी समजत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि कॅब चालकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पाहुणे घरी आले की, आपण त्यांच्या सेवेत कोणतीच कसर सोडत नाही. त्यांना आपले घर अगदी त्यांच्याच घरासारखे वाटावे. यासाठी प्रयत्नशील असतो. तशीच काहीशी आपुलकी आणि प्रेम या कॅब चालकांनी दाखवली आहे. एकदा बघाच व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @breesteele.mp3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “नशिब नेहमी दयाळू मनाच्या लोकांच्या बाजूने असते”, “भारतीयांचा अभिमान जपल्याबद्दल उबर ड्रायव्हरचे आभार”, “अशा लोकांचे कौतुक करायला छान वाटतं”, “अतिथी देवो भव:”, “योग्य वेळी कौतुक करणं नेहमी चांगलं असतं. ज्यांच्यावर अनेकदा टीका होते किंवा ज्यांना दुर्लक्ष केलं जातं, अशा लोकांचं कौतुक करणं आणखीनच महत्त्वाचं आहे. कारण हेच आपल्या प्रवासाला अविस्मरणीय बनवतात” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.