Noida School Girl student Death case : नोएडातून आलेला एक धक्कादायक व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. नोएडामध्ये शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सेक्टर-३१ मधील एका शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळा प्रशासनाविरोधात किशोर न्याय कायदा, तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यासाठी सध्या विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे. मुलीच्या आईनंदेखील आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, तिला सत्य जाणून घेण्याचा हक्क असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-३१ येथील प्रेसिडियम शाळेत सहावीमध्ये शिकणारी तनिष्का शर्मा (वय १२) ही ४ सप्टेंबर रोजी शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम पाहत असताना अचानक बेशुद्ध पडली. तातडीनं तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणाने केवळ पालकच नव्हे, तर स्थानिक नागरिकांमध्येही चिंता निर्माण केली आहे.पोलिस उपायुक्त यमुना प्रसाद यांनी सांगितलं की, विद्यार्थिनीच्या मृत्यूचं कारण उघड करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आलं. रिपोर्टमध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्यांमधून होणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तरीदेखील अचूक कारण स्पष्ट व्हावं यासाठी मृतदेहाभोवती आढळलेल्या वस्तू सुरक्षितरीत्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय खाद्य व औषध सुरक्षा विभागाकडूनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर विद्यार्थिनीची आई तृप्ता शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला. तृप्ता शर्मा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितलं, “सकाळी मी माझ्या मुलीला शाळेत सुखरूप सोडलं होतं. काही वेळानंतर शाळेकडून मला फोन आला की, तनिष्काची तब्येत बिघडली आहे. पण, काही वेळातच माझ्या निरागस मुलीचा मृत्यू झाला.”
शर्मा यांनी पुढे शाळा प्रशासनावर गंभीर आरोपही केले. त्यांनी म्हटलं, “माझ्या मुलीच्या मृत्यूच्या प्रत्येक क्षणाची माहिती मला हवी आहे. शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? माझ्या मुलीची तब्येत अचानक का बिघडली? या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली पाहिजेत.” त्यांनी असा आरोप केला की, शाळा प्रशासनानेंया घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे सत्य लपवलं जात असल्याचा संशय येत आहे.
पाहा व्हिडिओ
या संपूर्ण प्रकरणामुळे शाळा व्यवस्थापनाबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका लहानग्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतरही पारदर्शकपणे माहिती दिली जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे इतर पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा प्रशासनाकडून मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय काळजी घेतली जाते, आपत्कालीन परिस्थितीत मुलांना योग्य ती मदत मिळते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे आणि प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच पुढील निष्कर्ष स्पष्ट होतील. तोपर्यंत शाळा प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, तृप्ता शर्मा यांनी स्पष्ट केलं की, आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत कोणत्याही प्रकारचं गुपित राहता कामा नये. “मी माझ्या मुलीसाठी न्याय मागते आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची काळजी असते. माझ्या मुलीला मी शाळेत सुखरूप सोडलं; पण मला ती पुन्हा जिवंत दिसली नाही. हा धक्का मी कधीच विसरू शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नोएडा शहरात दुःखदायक वातावरण पसरलं आहे. पोलिस चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.