सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक पोलिस अधिकारी महिलांच्या मध्यमवर्गातील डब्यात, एका महिलेसोबत रीलच्या एका गाण्यावर नाचत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर, सोशल मीडियावरील सर्व नेटकऱ्यांचे याने लक्ष वेधून घेतले असून, या रील व्हिडीओची चांगलीच चर्चा झाल्याचे आपल्याला दिसते. त्यासोबतच एसएफ [SF] गुप्ता हे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून, आता त्याची चौकशी सुरू असल्याचे समजते. ६ डिसेंबर रोजी, रात्रीच्या प्रवासावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी, गुप्ता हे रेल्वेमधील महिलांच्या मध्यमवर्गातील डब्यात काम करत असताना, साधारण दहा-सव्वा दहाच्यादरम्यान हा रील व्हिडीओचा प्रकार घडला असल्याचे एनडीटीव्हीच्या [NDTV] एका लेखावरून समजते.
या व्हिडीओमध्ये एक महिला रील व्हिडीओ शूट करत असताना गुप्ता त्या महिलेला काही सल्ले देत असल्याचे दिसतात. त्यानंतर काही वेळाने ते स्वतः रील बनवणाऱ्या महिलेसोबत गाण्यावर नाचताना पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाच्या अधिकृत अकाउंटने, या व्हिडीओमध्ये आरपीएफ [RPF] अकाउंटला टॅग करून, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यावर [home guard] त्वरित कारवाई करावी, असे सांगितले.
यानंतर भविष्यात अशी गोष्ट पुन्हा घडू नये यासाठी ८ डिसेंबर रोजी, सरकारी रेल्वे पोलिसांनी या सर्व प्रकरणावर त्वरित कारवाई करून, गुप्ता यांच्या विरुद्ध एक तक्रार दाखल केली. कोणताही अधिकारी जो त्याच्या गणवेशात आहे, त्यास फोटो, व्हिडीओ, सेल्फी यासर्व गोष्टींसाठी पोज न देण्याचे स्पष्ट आदेश आहेत. परंतु, गुप्ता यांनी त्या सुचनांचे पालन न केल्यामुळे, त्यांच्या या कृतीबद्दल त्यांना जाब विचारण्यात येणार आहे, असेसुद्धा एनडीटीव्हीच्या लेखातून समजते.
“डिसेंबर ६, २०२३ रोजी सोशल मीडियावर सुरक्षा रक्षक गुप्ता हे गणवेशात आणि ऑन ड्युटी असताना, एका रील व्हिडीओवर नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. सर्व गोष्टींची तपासणी आणि खात्री करून, व्हिडीओमधील अधिकारी गुप्ता यांच्यावर कायदेशीर कारवाई केली असून, यापुढे भविष्यात अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट घडणार नाही यासाठी ही दक्षता घेतली आहे”, असे सांगणारी एक पोस्ट GRP, मुंबई यांनी आपल्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर केलेली आहे, असे समजते.