अनेकदा आपण जे पाहतो त्यावर विश्वास ठेवतो. कारण आपण त्या घटना, गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. मात्र, तंत्रज्ञानामुळे सोशल मीडियावर चालू घडामोडींबद्दल माहिती देणारे अनेक व्हिडीओ, फोटो फिरत असतात आणि अनेक व्यक्तींपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यातील काही गोष्टींमध्ये तथ्य असते, तर काही व्हिडीओ-फोटो हे मात्र जुने असतात. अशा जुन्या आणि प्रत्यक्षात त्याचा घटनेशी कोणताही संदर्भ नसताना, केवळ एखादे कॅप्शन लिहून तो पोस्ट केल्यामुळे लोकांचा त्या पाहत असलेल्या दृश्यांवर अगदी सहज विश्वास बसतो.
मात्र, अशा खोट्या बातम्या आणि माहितीपासून प्रत्येक व्यक्तीने सावध राहणे अत्यंत आवश्यक असते. सध्या मुंबईतील मीरारोड परिसरातील अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. नेमके प्रकरण काय आहे आणि त्यामागील सत्य आज आपण जाणून घेऊ.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडियावर, मुंबईतील मीरारोड परिसरात नुकत्याच घडलेल्या एका जातीय घटनेनंतर काही व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असल्याचे सांगणारा एक व्हिडीओ शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये काही पोलिसांची फौज लाठ्या घेऊन, काही व्यक्तींना घरात जाऊन अटक करत असल्याचे दृश्य दिसत असून, शेअर करणाऱ्या व्यक्तीने [yogesh yadav ] ‘ही कारवाई २२ जानेवारीला ज्या व्यक्तींनी रस्त्यावरील गाड्यांवर आणि नागरिकांवर हल्ला केला त्यांच्यावर करण्यात आली आहे’, अशा प्रकारचे कॅप्शन लिहून शेअर केला आहे. मात्र, तपास केल्यानंतर या व्हिडीओमागील सत्य काहीतरी वेगळेच आहे असे समजते.
इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत, ते पाहा :
हेही वाचा : प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट चर्चेत; या व्हायरल नोटेचं सत्य काय? वाचा सविस्तर
तपास :
या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी InVid या टूलचा वापर केला आहे. InVid या टूलवर व्हायरल होणारा व्हिडीओ अपलोड केला. तिथे असणाऱ्या किफ्रेम या पर्यायाचा वापर करून, व्हिडीओच्या अनेक किफ्रेम प्राप्त केल्या. यानंतर त्या फ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यावरून २६ ऑगस्ट २०२२ रोजी फेसबुकवरून Bh न्यूजने हाच व्हिडीओ शेअर केला असल्याचे आढळले. इतकेच नाही, तर हा व्हिडीओ मुंबईचा नसून हैद्राबाद येथील असल्याचा फेसबुकवरून शेअर झालेल्या व्हिडीओवरून समजते. siasat.com वरील बातमीच्या वृत्तानुसार, राजा सिंह यांच्या विरोधात निदर्शने तीव्र झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईची ही घटना हैदराबादमधील असल्याचे समजते. याची खात्री हैदराबादमधील पत्रकार राहुल देवुलपल्ली यांनीदेखील दिलेली आहे.
तपासदारम्यान सापडलेला जुना फेसबूक व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच युनूस लसानिया यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडिओही आढळला :
निष्कर्ष :
या संपूर्ण तपास आणि माहितीवरून, पोलिसांच्या कारवाईचा व्हायरल व्हिडीओ हा मीरारोड, मुंबईचा नसून २०२२ मध्ये हैदराबादमधील पोलिसांच्या कारवाईचा जुना व्हिडीओ आहे. या व्हिडीओमधील कारवाई ही राजा सिंहच्या अटकेच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनेनंतर, ओलिसांनी केलेल्या कारवाईची असल्याचे समजते.