Shocking Video: दिल्लीतील अली गाव येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका वृद्ध व्यक्तीला एक तरुण दिवसा ढवळ्या मारहाण करताना दिसत आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप पसरला असून राजधानीतील कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडत्या स्थितीबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
FPJच्या वृत्तानुसार, ही मारहाण २४ ऑक्टोबर रोजी झाली. रघुराज नावाचा व्यक्ती आपल्या घरातून कारने ऑफिसकडे जात होता. अचानक मोहित आणि त्याच्या साथीदारांनी त्याची कार थांबवली, काच फोडली, त्याला गाडीतून ओढून बाहेर काढले आणि निर्दयपणे मारहाण केली.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हल्लेखोरांनी काठ्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी सांगितले की मारहाणीमुळे रघुराज यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. या भीतीदायक व्हिडिओमध्ये रघुराज हे वेदनेने ओरडताना दिसत आहेत, तर हल्लेखोर रस्त्याच्या मधोमध त्यांना काठीने मारताना दिसतोय. घटनास्थळी असलेले आसपासचे लोक थांबवण्यासाठी जेव्हा पुढे आले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांनाही धमकावले आणि दूर राहण्याचा इशारा दिला.
एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, ही मारहाण वैयक्तिक शत्रुत्वातून झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी मुख्य आरोपी मोहितने अली गावात एक प्लॉट घेतला आणि त्यावर बांधकाम सुरू केले. पण एका महिन्याच्या आत दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) ते बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगून पाडले.
मोहितला संशय होता की रघुराज यांनीच बेकायदेशीर बांधकामाबद्दल DDA कडे तक्रार केली होती, ज्यामुळे त्याचे बांधकाम पाडण्यात आले. आपले नुकसान रघुराजमुळे झाले असे मानून, मोहितने सूड घेण्याचा प्लॅन केला आणि शुक्रवारी त्याच्यावर हल्ला केला.
गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
दिल्ली पोलिसांनी सरिता विहार पोलीस ठाण्यात मारहाण आणि धमकी देण्याच्या गुन्ह्यांखाली भारतीय दंड संहितेनुसार केस दाखल केली आहे. मोहित आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @delhi_samachar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दिल्लीत जमिनीच्या वादातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण आणि त्याचे मित्र रस्त्याच्या मधोमध वृद्धाला रॉड आणि काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीतील अलीगाव येथील आहे.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
