Rapido driver viral story: आजकाल महिलांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री उशिरा रस्त्यावर चालणे किंवा प्रवास करणे अनेकांसाठी धोकादायक ठरते. मग अशा परिस्थितीत कोणीही केलेली थोडीशी मदत किंवा सुरक्षित घरी पोहचण्यासाठी मदत केली तर ही मदत त्यावेळी फार महत्त्वाची ठरते. अशाच विचित्र परिस्थतीमध्ये अडकलेल्या तरुणीची मदत एका रॅपिडो ड्रायव्हरने केली आहे. ही छोटीशी पण प्रभावी मदत सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. ही घटना शिवानी शुक्ला नावाच्या तरुणीशी संबंधित आहे, जिने रात्री गरबा इव्हेंटनंतर परत घरी आल्यानंतर घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला आहे.

शिवानीने स्वतःच्या अनुभवाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यात तिने सांगितले की, गरबा खेळून रात्री उशीरा जेव्हा ती घरी पोहचली तेव्हा तिला कळले की, ती फ्लॅटची चावी विसरली आहे. तिची रुमवर राहणारी मैत्रिण देखील तिथे नव्हती. रात्रीच्या वेळ होती आणि रस्ते जवळजवळ रिकामे होते. अशा परिस्थितीत अनेक ड्रायव्हर्स राईड पूर्ण करून निघून जातात; पण त्या रॅपिडो ड्रायव्हरने आगळा निर्णय घेतला. त्याने शिवानीला सुरक्षित वाटावे यासाठी तो तिची रूममेट चावी घेऊन येईपर्यंत तिथे थांबला.

ड्रायव्हरची ही कृती केवळ व्यावसायिक जबाबदारीपुरती मर्यादित नव्हती; तर ती माणुसकी आणि सहानुभूतीचे उदाहरण ठरली. शिवानीला एकटे वाटू नये आणि सुरक्षित वाटावे यासाठी त्याने प्रयत्न केला. एवढचं नाही तर स्वत: तिथे थांबून तरुणीच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली. शिवानीने हा संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आणि काही वेळातच त्याबाबतची ही पोस्ट व्हायरल झाली. अनेकांनी त्या ड्रायव्हरच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले आणि तो समाजापुसमोर एक आदर्श उदाहरण असल्याचे म्हटले.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेकांनी रॅपिडो कंपनीने त्या ड्रायव्हरचा सन्मान करावा, अशी मागणी केली. लोकांचे असे म्हणणे आहे की, आजच्या काळात अशा माणसांमुळेच समाजात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना टिकते. व्हायरल झालेल्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी दिलेली प्रतिक्रियादेखील पाहण्यासारखी होती. एक युजर म्हणाला, “विश्वास पुनर्स्थापित झाला… जेव्हा बऱ्याचदा ड्रायव्हर्सबद्दल नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा सकारात्मक कथा शेअर करणे महत्त्वाचे आहे. खूप छान!” दुसऱ्या युजरने सांगितले, “अशी असतात खरी माणसं. मनापासून सन्मान.

ही घटना आपल्याला शिकवते की, अगदी छोटी मदत किंवा दयाळू कृतीही मोठा फरक घडवू शकते. अशा माणसांचा आदर समाजात केला पाहिजे. कारण- त्यांच्याकडून इतरांनाही प्रेरणा मिळते.