Viral Video Son Takes Mother To Google Office : आई आपल्या लेकरासाठी सर्वच गोष्टींचा त्याग करते. पण, तिचा लेकावर सगळ्यात जास्त जीव असतो. सकाळी शाळा, ऑफिसला वेळेत पोहचावेत म्हणून ती सगळ्यांच्या २ तास आधी उठते. स्वतःची झोप मोड करून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांबरोबर बसून अभ्यास घेते तर कामावरून उशिरा येणाऱ्या लेकराची वाट बघत रात्रभर जागी राहते. हा सगळा त्याग, तिची धडपड कुठेतरी प्रत्येक लेकराच्याही लक्षात असते. तर आज सोशल मीडियावर अशाच एका माय-लेकराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये गूगलमध्ये काम करणारा लेक आईला ऑफिस दाखवायला परदेशात घेऊन गेला आहे.

गूगलमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर असलेले अभिजय अरोरा वुयरु यांनी त्याच्या आईला सॅन फ्रान्सिस्कोमधील त्याच्या गूगल ऑफिस दाखवण्याचे ठरवले. यादरम्यान आई लेकाबरोबर ऑफिसमध्ये फिरताना, एकत्र जेवताना, मसाज चेअरसारख्या सेटअपचा आनंद घेताना दिसली. एवढं मोठं ऑफिस पाहून आईसुद्धा एकटक बघत राहते आणि आपल्या कष्टाचे चीज झाले असे नकळत तिच्या चेहऱ्यावर दिसून येते. तर लेकाने सुद्धा हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी आणि आईने आतापर्यंत केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोस्ट देखील शेअर केली आहे.

तुझ्या त्यागाची परतफेड कठीण (Viral Video)

लेकाने आईसाठी जणू काही एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये “या आयुष्यात मी कितीही काही केलं तरी तुझ्या त्यागाची परतफेड होऊ शकत नाही. हे सगळं फक्त तुझ्यासाठीच आहे. तिने माझ्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग गेला. माझा आधारस्तंभ बनली, न सांगता प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्या मागे उभे राहिले, मला प्रयत्न करायला शिकवले. शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी ती सकाळी ४ वाजता उठवायची; जेणेकरून मी वेळेवर शाळेत पोहोचू शकेल” ; अशी प्रसंशा आईची लेकाने केली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @abhijayarora_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच लेकाने “मी हा दिवस कधीही विसरू शकत नाही. माझ्या आईला माझे ऑफिस दाखवले! मी तिला सॅन फ्रान्सिस्कोच्या गूगलच्या ऑफिमध्ये घेऊन गेलो” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी लेकाचे भरभरून कौतुक करताना आहेत आणि करिअरविषयी टिप्स मागताना देखील कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.