Viral Video Student Deliberately Pushes Street Vendor’s Cart : एखादी गोष्ट पटली नाही, एखाद्या गोष्टीची परवानगी दिली नाही किंवा नियम सगळ्यांसाठी सामान नसतील, तर आंदोलन करणं हा एकच पर्याय आजकाल सगळ्यांना दिसतो. आंदोलनात बॅनरबाजी, घोषणा देण्यापर्यंत ठीक आहे. पण, जेव्हा आपण रागात इतरांची दुकानं, वस्तू किंवा स्टॉल फोडतो तेव्हा आपण त्यांचं किती नुकसान करतो याची आपल्याला कल्पनाच नसते. आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत हीच बाजू दाखवण्यात आली आहे, जे पाहून कदाचित तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
आंदोलनात अनेक जण उपाशीपोटी दिवस-रात्र भटकत असतात. अशा वेळी काही विक्रेते त्यांना खाऊ घालतात. पण, त्यांचाही आंदोलनात सहभाग घेणारे सन्मान करीत नाहीत. आजच्या व्हायरल व्हिडीओत तेच पाहायला मिळाले आहे. काही विद्यार्थी आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरून धावत-पळत इकडे- तिकडे जाताना दिसत आहेत. दुसरीकडे एक छोटासा भेळविक्रेता रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसत आहे. एक विद्यार्थी रस्त्यावरून जाताना विक्रेत्याचा स्टॉल मुद्दामहून पाडून टाकतो. स्टॉल मुद्दामहून पाडल्याचे पाहून, एक जण ‘अरे, काय माणूस आहे’, असे संतापजनक हावभाव व्यक्त करतो, जे पाहून तुम्हालाही वाईट वाटेल.
तो तुमचा शत्रू नाहीये, तो कोणाचा तरी बाप आहे (Viral Video)
९ ते ५ असा जॉब करणाऱ्या किंवा एखादं दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीला एका ठिकाणी बसून, काम करावं लागतं; पण ट्रेन आणि रस्त्यावर छोट्या छोट्या वस्तू विकणाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. स्टॉलवर पदार्थ विकून त्यांना घर चालवायचं असतं. त्यामुळे व्हिडीओतील दृश्याप्रमाणे त्यांच्याबरोबर काही घडलं की, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. न्याय मागण्याच्या कृतीदरम्यान धावण्याच्या या मूर्ख पद्धतीसह विद्यार्थ्यांचं हे वागणं खूपच लज्जास्पद आहे. एकदा बघाच हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thestrictmedia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “हे किती घृणास्पद आहे. तुमच्या समर्थनासाठी आलेल्या आणि तुम्हाला आंदोलनात खायला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबरोबर हे किती योग्य आहे”, “तो आजोबा तुमचा शत्रू नाहीये, तो कोणाचा तरी बाप आहे, जो छोटा स्टॉल चालवून जगण्याचा प्रयत्न करीत आहे”, “देव, अशा आंदोलन करणाऱ्यांना वाईट शिक्षा दे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.