सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला मेरठमधील दौराला स्टेशनवर अचानक आग लागली. काही वेळातच आगीने दोन डब्यांना जळून खाक केले. आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, आग लागलेल्या डब्यातील प्रवासी तात्काळ बाहेर पडले. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवाशांनी एकजुटीने ट्रेनचे उर्वरित डबे आगीपासून वाचवले.
या सहारनपूर दिल्ली पॅसेंजर ट्रेनच्या डब्यांना लागलेली आग इंजिनापर्यंत पोहोचली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या मदतीने तात्काळ डबे इंजिनपासून वेगळे केले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मेरठ सिटी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक आरपी शर्मा यांनी सांगितले की, दौराला जवळ ट्रेनच्या एका डब्यात धूर येऊ लागला, त्यानंतर ट्रेन स्टेशनवर थांबवण्यात आली.
(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
शर्मा यांनी सांगितले की, डब्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे स्थानकावर उतरवण्यात आले. तत्काळ अग्निशमन विभागाला कळवण्यात आले आणि रेल्वे स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या मदतीने दोन्ही डबे लोकोमोटिव्हपासून वेगळे केले. रेल्वे अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कोणत्याही प्रवाशाच्या जीवित वा मालमत्तेबाबत कोणतीही माहिती नाही. आगीचे कारण सध्या तपासले जात आहे.