Viraj Srivastava Inspirational Journey : स्वप्न अनेक जण बघतात; पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा नियतीने रचलेल्या सापळ्यातून मार्ग काढत स्वतःला सिद्ध करण्याची जे धडपड करतात; तेच खरे खेळाडू असतात. कंटेंट क्रिएटर रत्नम ई एम कालरा यांनी अलीकडेच रॅपिडो ड्रायव्हर (कॅप्टन) म्हणून काम करणारे आणि माजी सहायक दिग्दर्शक विराज श्रीवास्तव यांची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली आहे.
विराज श्रीवास्तव फक्त अतिरिक्त पैसे कमविण्यासाठी क्रिएटर रॅपिडो ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांची पहिलीच राईड होती आणि प्रवासादरम्यान त्यांची भेट कंटेंट क्रिएटरशी झाली. खांद्यावर असणारा अॅक्शन कॅमेरा पाहून विराज यांनी कंटेंट क्रिएटरला “तू ब्लॉगर आहेस का” असे सहज विचारले. कंटेंट क्रिएटरने “तो फिल्ममेकर आहे”, असे सांगितले. मग ते ऐकून, त्याने एकेकाळी रॅपिडो ड्रायव्हरसुद्धा फिल्ममेकर होता, असे सांगितले आणि मग दोघांमधला संवाद सुरू झाला.
विराज यापूर्वी टीव्हीवरील लोकप्रिय दैनिक मालिका ‘कुबूल है’मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होते; ज्यामध्ये सुरभी ज्योती आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी अभिनय केला होता. त्यांचा पहिला पगार सुमारे २,२५० रुपये होता आणि पुढे त्यांना एका टीव्ही प्रॉडक्शन हाऊसकडून ऑफर मिळाली होती. त्यांच्याकडे तीन पासपोर्ट आहेत आणि ते अर्धे जग फिरून आले आहेत. संगीत कौशल्याबद्दल सांगताना विराज म्हणले की, ते ड्रम, काँगो, युकूले वाजवण्यात तरबेज आहेत. तसेच हिंदुस्थानी संगीतातील ठुमरी या अर्धशास्त्रीय गायन प्रकाराचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.
तू माझ्यापर्यंत पोहोचू नकोस, मी तुझ्यापर्यंत पोहोचेन… (Viraj Srivastava Journey)
पण, नियतीने तुमच्यासाठी काय योजना आखली आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. विराजच्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःचे नाव कमावण्यासाठी त्यांनी आईला सोडून दिल्लीहून मुंबईला येण्याचा घेतला. पण, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. तेव्हा त्यांना आईची खूप आठवण आली तरीही त्यांना तिच्याकडे परत जाणे शक्य नव्हते.
जिद्द न सोडता, त्यांच्या मनात दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न अजूनही जागे आहे. “माझं आयुष्य मला तिकडे पोहोचू देत नाही आहे; पण मीही हट्टी आहे. मी एक दिवस तिथे नक्कीच पोहोचेन. तू माझ्यापर्यंत पोहोचू नकोस, मी तुझ्यापर्यंत पोहोचेन. मृत्यूच्या आधी एक इच्छा आहे, जी मी पूर्ण करूनच राहीन. मी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आणि ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’ असं म्हणणारच,” असं ते ठामपणे या व्हिडीओत म्हणताना दिसले आहेत; जो तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ratnamemkalra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.