Woman Cleaning Train Window For Reel : आजकाल सोशल मीडियावर रील्स (Reels) जास्तच ट्रेंडमध्ये आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. म्हणून अनेक जण आवड म्हणून, काही जण स्वतःचा व्यवसायात प्रगती करण्यासाठी, तर बहुतांश जण फक्त प्रसिद्ध होण्यासाठी या रील्सचा उपयोग करतात. आजकाल रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं जणू ट्रेंड झाला आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाण म्हणजेच हॉटेल, मंदिरे, रेल्वे स्थाकावर तर भररस्त्यात अनेक जण विविध कन्टेन्टवर व्हिडीओ शूट करत असतात. पण, आज तर एका तरुणीने हद्द पार केली आहे.

ट्रेन प्रवासात खिडकीजवळ बसून व्हिडीओ, फोटो काढण्यात तरुण मंडळी उत्सुक असतात. तर रील किंवा फोटो काढण्यासाठी की काय माहिती नाही; पण, तरुणी प्लॅटफॉर्मवर उतरून तिच्या ट्रेन शेजारी असणाऱ्या ट्रेनची खिडकी आधी पाण्याने मग टिश्यू पेपरने स्वच्छ करताना दिसते आहे. इथपर्यंत ठीक होते. पण, स्वछता झाल्यानंतर तिने प्लास्टिकची बाटली आणि टिश्यू पेपर रुळांवरच फेकून दिला आहे. तिथे उपस्थित एका सहप्रवाशाने या गोष्टीचा व्हिडीओ शूट करून घेतला.

तुमची कृती तुम्ही कोण आहात हे दर्शवते (Viral Video)

सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच बसस्थानक, थिएटरमध्ये, उद्याने, तर ट्रेन प्रवास करतानासुद्धा आपण अनेक पदार्थ खातो किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन करतो. खाण्याला कोणतेही बंधन नसले तरीही आपला कचरा आपली जबाबदारी हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण, ही जबाबदारी किती जण योग्यरीत्या पार पाडतात? व्हिडीओतच बघा ना रीलसाठी का असेना एकीकडे खिडकी पाण्याने स्वच्छ धुवून दुसरीकडे तीच पाण्याची बाटली आणि टिश्यू रुळांवर फेकण्यात काय अर्थ आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ @socialawarenezz या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये “रील्ससाठी खिडकी साफ केली आणि रुळावर टिश्यू आणि बाटली फेकून दिली” अशी कॅप्शन दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “शिक्षण, फॅशन आणि फॉलोअर्सबद्दल नाही; तुमची कृती तुम्ही कोण आहात हे सांगते”, रीलसाठी पाण्याने खिडकी स्वच्छ केली आणि बाटली, टिश्यू रुळांवर फेकून दिल्या; काय डोकं आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.