Woman Staff Beats Shop Owner With Slipper : लहान मुली, तरुणी, महिलांची सुरक्षितता प्रत्येक शहरात अधिक महत्त्वाची असते. सार्वजनिक ठिकाणी, मध्यरात्री किंवा अगदी ऑफिसच्या ठिकाणीसुद्धा त्यांना सहज वावरता यावं असं सुरक्षित वातावरण असलंच पाहिजे. पण, आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे महिला कुठेच सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तर घडलं असं की, तरुणीला दुकानमालकानं अश्लील मेसेज करायला सुरुवात केली आहे.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार तरुणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथे एका दुकानात काम करीत होती. दुकानमालक तिला सतत अश्लील आणि अयोग्य मेसेज पाठवायचा. मेसेजचे प्रमाण वाढल्यामुळे त्या तरुणीने दुकान मालकाला अद्दल घडवायचे ठरवले. तिने स्वतःची चप्पल काढली आणि त्याला मारण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच ही घटना त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केली. तरुणी दुकानदाराला चप्पलने वारंवार मारताना आणि रडताना दिसत आहे, ती कथित छळामुळे स्पष्टपणे व्यथित झाली आहे.

तरुणीला नोकरीवरून काढले (Viral Video)

तरुणी दुकानदाराला मारत असताना दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली. काही नागरिकांनी आणि मुलीच्या नातेवाइकांनी घटनास्थळी न्याय मागितला. त्यांनी दुकानदाराला तरुणीच्या पाया पडून सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास भाग पाडले. न्यूज18 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, दुकानदारावर कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई करण्यात आलेली नाही. या भांडणानंतर तरुणीला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी अद्याप औपचारिक निवेदन दिलेले नाही किंवा गुन्हा दाखल केला गेलेला नाही. व्हायरल झालेले पुरावे आणि जनतेचा रोष पाहता, दुकानमालकावर काय कारवाई केली जाते याकडे अनेकांचे लक्ष आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nextminutenews7 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला, जो सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे.