Viral Video Mumbai Local: मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात लोकलमध्ये काही ना काही नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची घाई आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. पण अनेकदा कामावरून परतताना अनेकांना खूप उशीर होतो.
विशेष म्हणजे महिला उशीरा रात्री प्रवास करणं टाळतात. तसंच अनेकदा रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पुरूषही प्रवास करतात. अनेकदा तर डबा रिकामाच असतो. आणि इतक्या रात्री एकटीने प्रवास करण्याची भीती कोणालाही सहज वाटू शकते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात महिलेने रात्री एकटीने प्रवास करण्याचा तिचा अनुभव सांगितला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Woman in Mumbai Local Train Viral Video)
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक महिला रात्रीच्या वेळी मुंबई लोकलमधून प्रवास करत आहे. ती ज्या डब्यात आहे तो डब्बा संपूर्ण रिकामा दिसतो आहे. ती पहिल्यांदाच मध्यरात्री एकटीने लोकलचा प्रवास करतेय.
यादरम्यान, ती व्हिडीओ रेकॉर्ड करत तिचा अनुभव सांगते. ती म्हणते, “मी प्रवास करत असताना माझ्यासोबत सुरक्षारक्षक होते आणि त्यामुळे माझा प्रवास सुखरूप झाला. या दादांना मनापासून धन्यवाद.”
लेडीज डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस असल्यामुळे त्या महिलेचा प्रवास खूप सुखरूप झाला आणि तिला कसलीच भीती वाटली नाही. तिचा हा अनुभव सांगताना ती अगदी जबाबदारीने हे सगळं व्हिडीओद्वारे दाखवत होती. या व्हिडीओत महिलेने पोलिसांनाही घेतलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sachinkamble5571 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “शेवटच्या लोकल ट्रेनने मध्यरात्री प्रवास करतानाचा अनुभव माझ्या बायकोने शेअर केला” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुंबई पोलिसांना सलाम”, तर दुसऱ्याने “आमची मुंबई आहेच मस्त” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मुंबई पोलिसांचा अभिमान आहे.” तर एकाने “पोलिस म्हणजे पांडुरंग आहेत ते सदैव आपल्या पाठीशी असतात” अशी कमेंट केली.