Viral Video Today: निवडणुकीच्या रणांगणात हेवेदावे, वाद, हाणामारीचे प्रसंग मागील कित्येक वर्ष आपणही ऐकले असतील. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील समर्थकांचं रौद्र रूप पाहून नेटकरीही हादरून गेले आहेत. आता इतकी कोणती निवडणूक सुरु आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना? खरं तर कोणत्या आमदारकी- खासदारकीची निवडणूक नसून ही एका गृहसंकुलाच्या सेक्रेटरी पदाची निवडणूक होती. पण या निवडणुकीतील उमेदवारांच्या सदस्यांनी बड्या बड्या नेत्यांच्या समर्थकांना मागे टाकेल असा धिंगाणा घातल्याचे दिसतेय. नोएडा येथील एका उच्चभ्रू इमारतीतील हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेमका हा वाद कशावरून सुरु झाला पाहुयात..
इमारतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सेक्टर 78 येथील हायड पार्क सोसायटीत हाणामारी झाल्याचे समजत आहे. कोणाचा उमेदवार चांगला या कारणावरून हा वाद सुरु झाला. यावेळी समर्थनाला आलेल्या महिला इतक्या पेटून उठल्या की त्यांनी एकमेकींचे केस ओढून मारहाण सुरु केली. यावेळी इमारतीतील अन्य सदस्य व सुरक्षारक्षक मध्यस्थी करून वाद थांबवण्यासाठी गेले पण यातील एका महिलेने सुरक्षा रक्षकाच्या हातातील बांबू घेऊन दुसरीला मारण्यासाठी धाव घेतली. यावेळी दोन महिलांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजत आहे.
बिल्डींच्या निवडणुकीतील हा वाद चिघळत गेल्यावर शेवटी तिथे पोलिसांना पाचारण करावे लागले. सध्या दोन सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. या महिलांनी सुरक्षा रक्षकावरही आरोप लगावले आहेत.
मतदानावरून सुरु झाली मारामारी
मागील काही दिवसात नोएडा शहरातून असे अनेक वादाचे, हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, यामध्ये बहुतांश वेळा उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशी नशेच्या अवस्थेत सुरक्षा रक्षक किंवा डिलिव्हरी करणाऱ्यांना शिवीगाळ करताना, मारहाण करताना दिसून आले आहेत.