Kedarnath Temple Viral Video : मैदानात क्रिकेट, विहरीत पोहणे, चित्रपटगृहात सिनेमा आदी प्रत्येक गोष्टीसाठी ठिकाणं ठरलेली आहेत; त्यामुळे कधी, कुठे, काय करावं याच भान असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक धार्मिक ठिकाणीसुद्धा फोटोग्राफी, कपडे कसे परिधान करायचे यासाठी नियम नेमून दिलेले असतात. तरीही अनेक जण या नियमांचे उल्लंघन करायला मागे-पुढे बघत नाहीत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये केदारनाथ मंदिरासमोर काही जण क्रिकेट खेळताना दिसले आहेत.
केदारनाथ मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमतात. येथील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, काही जण या धार्मिक स्थळांना भेट देताना भान विसरून जातात. काही जण परवानगी नसताना फोटो काढतात, मद्यपान करून मंदिरात प्रवेश करतात. पण, आज तर चक्क मंदिराबाहेर काही मुले क्रिकेट खेळताना दिसली आहेत; त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे.
मंदिरांचे पावित्र्य हळूहळू नष्ट होतंय (Viral Video)
मनातील असंख्य प्रश्न, अनेक विचार शांत करायला अनेक जण धार्मिक ठिकाणांना भेट देतात. पण, तिथेही शांतता भंग करणारी कृत्ये केली जात असतील तर कोणाचाही संताप होऊ शकतो. अनेकदा प्रियकराला प्रपोज किंवा इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर इथे रील बनवून धार्मिक स्थळांचे पावित्र्य नष्ट करतात, त्यामुळे केदारनाथ मंदिरासमोर फोटोग्राफी करण्यास आणि मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पुन्हा एकदा रीलसाठी केदारनाथ मंदिराबाहेर काही मुले क्रिकेट खेळताना दिसली आहेत. मंदिराचा परिसर हे काही क्रिकेट खेळण्याचे ठिकाण नाही, याचे भानही या तरुण मंडळींना राहिलेले नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @iNikhilsaini या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण म्हणत आहेत, “क्रिकेट खेळलं तर काय झालं”, तर अनेक जण “फक्त रील्ससाठी ते करणे चुकीचे आहे आणि मंदिराचा परिसर हा क्रिकेट खेळण्याचे ठिकाण नाही, ते एक पूजास्थळ आहे. आज क्रिकेट आहे, उद्या कोणीतरी दुसरा स्टंट घेऊन येईल. मंदिरांचे पावित्र्य अशाच प्रकारे हळूहळू नष्ट होत आहे”; अशी कमेंट एका युजरने केली आहे.