रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी वर्षांतून अनेकदा रेनडिअरच्या रक्ताने आंघोळ करतात, असा दावा रशियातील काही माध्यमांनी केलाय. गेल्यावर्षी पुतिन हे अल्टाई माऊंटनला गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी ७० किलो रेनडिअरचे मांस आणण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांनी रेनडिअरच्या रक्तात आंघोळ केली होती, असा दावा रशियाच्या काही माध्यमांनी केला असल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे.
रेनडिअरच्या रक्तात आंघोळ केली जाते याचे फोटोही माध्यमांनी प्रकाशित केले आहे. रक्त उकळवून ते बाथ टबमध्ये पाण्यासोबत मिसळलं जातं आणि त्यात आंघोळ केली जाते, असं माध्यमांनी समोर आणलं आहे. अशा प्रकारे रक्ताच्या पाण्यात आंघोळ करण्याची ही फार प्राचीन पद्धत असून, यामुळे तब्येत सुद्ढ राहते असा दावा करण्यात आलाय. याठिकाणी येणारे अनेक लोक केवळ रेनडिअरच्या रक्तात आंघोळ करण्यासाठीच इथे येतात, असा दावा करण्यात आलाय. रेनडिअरपासून अनेक चिनी पारंपरिक औषधं बनवली जातात, तेव्हा रेनडिअरचे मांस, कातडी, शिंग ही चीनमध्ये निर्यात केली जाते. ही औषधं हाडांचं दुखणं, अस्थमासारखे आजार बरे करू शकतात. तेव्हा पुतिनसह रशियामधले अनेक बडे लोक अल्टाई माऊंटमध्ये खास रक्ताने आंघोळ करण्यासाठी येतात, असा दावा करणारे अहवाल रशियाच्या अनेक वृत्तपत्रांत प्रकाशित करण्यात आलेत.
वाचा : इथं उसाला मिळतो तब्बल दोन लाखांहून अधिक भाव!
इतकंच नाही तर चांगल्या तब्येतीसाठी आणि सुंदरता कायम राहावी यासाठी अनेकजण रेनडिअरच रक्तही पितात, असंही समोर आलंय. अल्टाई माऊंटमधले काही फोटोही प्रकाशित करण्यात आलेत. रेनडिअरची अशा प्रकारे कत्तल करणाऱ्यांवर प्राणीप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला आहे आणि हे लवकरात लवकर बंद करण्याची मागणीही प्राणीप्रेमी संघटनांनी केलीये.