Wari 2025 Beautiful Video Viral : आषाढी वारीला सुरुवात झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. यंदा आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे. त्यापूर्वीच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. वारकरी ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता विठू नामाचा गजर करत विठोबाच्या चरणी लीन होण्यासाठी निघाले आहेत. याची देही याची डोळा त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागून आहे. अशातच सोशल मीडियावरही वारीचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात एक व्हिडीओ असा आहे, जो पाहून तुम्हालाही वारीतील खरी सुंदरता, एकता अनुभवता येईल. वारीतील ते दृश्य पाहून तुमचंही मन आनंदाने भरून येईल.
वारी म्हणजे एक आनंद, उत्साह आणि पांडुरंगाप्रती असलेली भक्ती व्यक्त करण्याचा सोहळा असतो. वारी म्हणजे एक सोहळाच नाही तर एक उपासना आहे. याच वारी सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी सौहार्द आणि समतेची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. दरम्यान, व्हायरल व्हिडीओतूनही वारीतील सुंदरता, एकता, सर्वधर्म समभावना पाहायला मिळाली.
वारीत एक ऊर्जा आहे, उत्साह आहे, जो सहभागी झालेल्या प्रत्येकास आपलसं करतो. याच वारीत हिंदू-शीख ऐक्याचे दर्शन घडले. व्हिडीओत पाहू शकता की, एक शीख बांधव वारकऱ्यांच्या मेळाव्यात चक्क टाळ- मृदुंगाच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतोय. विठुरायाचा गजर करत तो वारकऱ्यांमधलाच एक होऊन गेला आहे. एका शीख बांधवाचे हे पांडुरंगाप्रती असलेले प्रेम पाहून वारकरीदेखील भारावून गेले, त्यांनीही त्या शीख बांधवाबरोबर विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होण्याचा आनंद घेतला.
वारीतील सुंदरता दाखवणारा हा व्हिडीओ @LayBhari नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही अनेक कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, शीख समुदाय आणि वारकरी सांप्रदाय दोन्ही बंधुभाव जपणार आहेत. संत नामदेव महाराज यांचे अभंग आजही गुरु ग्रंथ यात आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, या वारीमध्ये कोणी कमी मोठा असा नसतो, असतो तो फक्त विठ्ठल भक्त.. वारकरी… तिसऱ्या एकाने लिहिले की, माऊलीची वारीच आहे तशी, सर्वांना घेऊन चालते. चौथ्याने लिहिले की, पालखी वर्णन करायला शब्द, कागद, शाई कमी पडते; पण आनंद मात्र जबरदस्त मिळतो.