मानवाने जंगलं नष्ट करुन प्राण्यांच्या नैसर्गिक आदीवासामध्ये घुसखोरी केल्यानेच मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं अनेकदा कानावर येतं, बातम्यांमध्ये वाचायला मिळतं. याचबरोबर मानवाने केलेल्या या आक्रमणाचे दुष्परिणाम दाखवणारे काही व्हिडीओही वेळोवेळी समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमधून विकास कामांना प्राधान्य देतानाच वन्य प्राण्यांचा विचार करण्याची गरज का आहे हे अधोरेखित होत असल्याचं दिसत आहे.

आयएएस अधिकारी असणाऱ्या सुप्रिया शाहू यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एका कालव्याच्या मध्यभागी अडकलेले काही हत्ती बंधाऱ्याच्या भिंतीवरुन वर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या बंधाऱ्याचे काठ हे हत्तींना वर चढण्याच्या दृष्टीने फारच तिरके आणि उंच आहेत. त्यामुळे अनेकदा प्रयत्न करुनही हे हत्ती घसरुन खाली येताना दिसत आहेत. मदत मागत असल्याप्रमाणे हे हत्ती आवाज काढत सतत येणाऱ्या अपयशाबद्दल नाराजीही व्यक्त करताना दिसताय. स्थानिक लोकांचा आवजही या व्हिडीओमध्ये येत असून ही लोक दूर उभे राहून हा सारा प्रकार पाहतायत.

शाहू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना एक मोठी कॅप्शन दिलीय. “माझ्या तामिळनाडूमधील फॉरेस्ट टीम (वनअधिकाऱ्यांच्या गटासोबत) हा व्हिडीओ शेअर केलाय. जंगली किंवा जंगलांजवळच्या भागांमध्ये विकास काम करताना आपण थोडं संवेदनशीलपणे विचार करणं गरजचं आहे. संपूर्ण देश पातळीवरच आपल्याला या क्षेत्राबद्दल नव्याने विचार करण्याची गरज आहे,” असं शाहू म्हणाल्यात.

कर्नाटकमधील वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार सोमवारी घडला. लक्ष्मण तिर्थ नदीच्या कालव्यामध्ये हनागोडू गावाजवळ हा सर्व प्रकार घडला. मैसूर जिल्ह्यातील हुनसूर तालुक्यामध्ये हे गाव आहे. पिकाचं नुकसान करणाऱ्या हत्तीच्या कळपाचा गावकऱ्यांनी पाठलाग केला. तेव्हाच हे हत्ती या कालव्यामध्ये अडकले. नंतर या हत्तींना वाट सापडली आणि ते जवळच्या नागरहोले व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये निघून गेले, असं अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.

काही जणांनी काही ठिकाणी अशापद्धतीची समस्या यापूर्वीच सोडवण्यात आल्याचा पुरावा देणारे व्हिडीओ पोस्ट केलेत. यामध्ये कालव्याच्या कालव्यांच्या भिंतींवरच माती टाकून हत्तींना येण्याजाण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन दिल्याचं दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहू यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून १५ हजारहून अधिक लोकतांनी तो पोस्ट केल्यानंतर १८ तासांच्या आता पाहिला आहे.