Coconut Sellers Monthly Income: उन्हाळा आल्यावर शरीराचे संतुलन राखणे गरजेचे असते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. या काळात लोक उष्णता कमी करून शरीर डिहायड्रेट ठेवण्यासाठी नारळाचे पाणी आवडीने पितात. नारळ पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहेत, हे आपणा सर्वांना माहीत आहेतच. पण ते असो; पण आता आपला हा विषय नाही. आता ज्याबाबत तुम्हाला सांगायचेय ते म्हणजे- तुम्ही रस्त्यावर नारळ-पाणी विकणाऱ्या विक्रेत्याला पाहिले असेलच. मात्र, हा रस्त्यावर नारळ पाणी विकणारा दिवसाला किती कमावतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याच्या कमाईचा आकडा पाहून तुम्हीही चकित व्हाल. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सांगितलेला आकडा पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.
सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये असे दिसून येते की, पाणीपुरी किंवा चहा विकणारे लोक सुशिक्षित पदवीधरांपेक्षा जास्त कमाई करतात. त्यावर इंटरनेटवर अनेक मीम्स व्हायरल होतात. परंतु, कुठे तरी एक सत्य आहे, जे खरोखरच हृदयाला भिडते. अशीच एक परिस्थिती बेंगळुरूमध्ये पाहायला मिळाली जिथे नारळ-पाणी विकणाऱ्याची एक दिवसाची कमाई इतकी आहे की, कदाचित बी.कॉम. पदवीधराचा मासिक पगारही तेवढा नसेल, जे खरोखरच आश्चर्यकारक आहे.
बेंगळुरू कंटेंट क्रिएटर कॅसी परेरा यांनी अलीकडेच एक रील पोस्ट केली, ज्याने इन्स्टाग्राम वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्हिडीओमध्ये एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नारळ-पाणी विकणाऱ्या व्यक्तीकडून तो दिवसाला किती रुपयांची कमाई करतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तो किती कमावतो, हे जाणून घेण्यासाठी त्याने संपूर्ण दिवस त्याच्याबरोबर घालवला. त्याच्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर त्यांनी आपला अनुभव सोशल मिडियावर शेअर केला.
व्हायरल व्हिडीओमध्ये इन्फ्लुएन्सर सांगतो की, या दुकानात एक नारळ ७० रुपयांना विकला जातो आणि दुकानदार एका दिवसात जवळपास दोन हजार नारळांची विक्री करतो. म्हणजे दिवसाला तो १ लाख ४२ हजार रुपये तर महिन्याला हा नारळ विक्रेता ४२ लाख रुपये कमावतो. हा आकडा खरंच सर्वांसाठी थक्क करणारा आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्फ्लुएन्सर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट @cassiusclydepereira वरून शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ३० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच, लोकांनी त्यावर बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “कदाचित मी चुकीच्या क्षेत्रात शिकलो आहे.” दुसऱ्याने कमेंट केली की, असे दिसते की मलाही श्रीमंत होण्यासाठी नारळ-पाणी विकणारा व्हावे लागेल.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.