व्हॉट्सअप हा आता सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अगदी ऑफिसपासून ते घरातील मंडळींचेही व्हॉट्सअप ग्रुप्स असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. मात्र याच व्हॉट्सअपवरील डीपी सुद्धा कायम चर्चेत असतात. अनेकदा तर लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये आणि खास करुन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा व्हॉट्सअप डीपीवरुनही वाद झाल्याच ऐकावयास मिळतं. पण हा घरातील वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचला तर? पुण्यामध्ये काही असच झालंय. थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तांपर्यंत एका तरुणाने पत्नी व्हॉट्सअपवरील डीपीवरुन भांडत असल्याची तक्रार ट्विटरवरुन केली, ज्याला पुणे पोलीस आयुक्तांनीही उत्तर दिलंय.

सध्या सोशल मीडिया म्हणजे अफवांचा बाजार असं चित्र निर्माण झालंय. मात्र त्यावेळेस याच माध्यमातून लोकांची जागृती करण्यासाठी आणि एका क्लिकवर त्यांच्यासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या शहरांमधील प्रशासकीय यंत्रणा तसेच पोलीस अधिकारी आणि विभाग सोशल नेटवर्किंगचा प्रभावीपणे वापर करताना दिसत आहेत. यामध्येही महाराष्ट्रात मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांची ट्विटर अकाऊंट्स ही खास लोकप्रिय आहेत. या दोन्ही अकाऊंटवरुन मिम्स आणि तरुणाईच्या भाषेमध्ये ट्रेण्डींग विषयांना धरुन करण्यात येणाऱ्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. मुख्य अकाऊंट्सोबतच दोन्ही महत्वाच्या शहरांच्या पोलीस आयुक्तांचेही वेगळे अकाऊंट्स असून त्यावरही अशापद्धतीने जनजागृती केली जाते. याच जगजागृतीचा भाग म्हणून नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरुन लाइव्ह वीथ सीपी पुणे सीटी या अंतर्गत सर्वसामान्यांशी ट्विटरवरुन संवाद साधला. यादरम्यान अनेकांनी वेगवगेळे प्रश्न गुप्ता यांना विचारले. मात्र त्यात एका तरुणाने थेट पत्नीसोबतच्या व्हॉट्सअप डीपीवरुन होणाऱ्या वादावर तोडगा शोधण्यासाठी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारला. त्यावर आयुक्तांनीही भन्नाट उत्तर दिलं.

झालं असं की, या संवादादरम्यान प्रतिक कारंजे नावाच्या व्यक्ती थेट पुणे पोलीस आयुक्तांना टॅग करुन प्रश्न विचारला. “मी माझ्या व्हॉट्अप डीपीवर पत्नीचा फोटो ठेवत नाही म्हणून ती नेहमी माझ्याशी भांडते,” असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. पुढे प्रतिक यांनी यासाठी पुणे पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सेल सुरु करतात तशा पद्धतीने घरगुती हिंसेसाठी सुरु केलेल्या भरोसा सेलकडे यासंदर्भात तक्रार करु शकतो का असा प्रश्न विचारला. “मी यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलची मदत घेऊ शकतो का?”, असं प्रतिक यांनी विचारलं.

यावर पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन उत्तर देण्यात आलं. “नेहमी एकमेकांवर भरोसा ठेवं हे कायम चांगलं असतं. बाकी इतर घरगुती हिंसाचारासंदर्भातील तक्रारींसाठी तुम्ही कोणत्याही वेळी भरोसा सेलशी संपर्क करु शकता,” असं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अशाच काही मजेदार प्रश्नांची भन्नाट उत्तरं पोलीस आयुक्तांनी या लाइव्ह चॅटदरम्यान दिल्याचं पहायला मिळालं.