मुलीला जन्म देणाऱ्या महिलेला अपमानित करण्याच्या अनेक घटना आजही आपल्याकडे पाहायला मिळतात. २१ व्या शतकात स्री-पुरुष समानतेचा मंत्र जपला जात असला तरी, अनेकांना मुलीपेक्षा वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असतो. या मानसिकतेमुळे बऱ्याच ठिकाणी मुलीला जन्म देणाऱ्या सूनेवर सासरच्या मंडळीकडून छळ केल्याच्या वार्ताही आपल्याला ऐकायला मिळतात. पण मुलीच्या जन्माचे स्वागत करुन एका महिलेने अशा घटनांना आणि मानसिकतेला छेद दिला आहे. उत्तरप्रदेशमधील हमीरपुर जिल्ह्यातील सासूने आपल्या सूनेने मुलीला जन्म दिल्याचा आनंद साजरा केला. नातीच्या जन्माचे स्वागत करताना या महिलेने आपल्या मुलीप्रमाणे असणाऱ्या सूनेला महागडी भेट वस्तू देवून आपला आनंद व्यक्त केला.
आपल्या सूनेने कन्यारत्नाला जन्म दिल्यामुळे सासूने चक्क महागडी गाडी सूनेला दिली. तसेच लक्ष्मीच्या रुपात घरी आलेल्या नातीचे जोरदार स्वागत केले. आरोग्य विभागातून निरिक्षक पदावरुन सेवा निवृत्त झालेल्या प्रेमा देवी यांनी आपल्या सुनेने मुलीला जन्म दिल्यानंतर आनंद साजरा केला. प्रेमा देवी या आरोग्य विभागातून सेवानिवृत झाल्या असून त्या आपला मुलगा आणि सूनेसह हमीरपुर जिल्ह्यात राहतात. त्यांचा मुलगा देखील सरकारी सेवेत कार्यरत आहे. तर सून खुशबूही गृहीणी आहे. उत्तर प्रदेशमधील या सासू -सूनेतील नाते मुलगी आणि आई प्रमाणे फुलले आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमा यांच्या सूनेने कन्येला जन्म दिला. सूनेने मुलीला जन्म दिल्याने प्रेमा यांना अत्यानंद झाला.
आपला पुत्र आणि सुनेने कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर प्रेमा यांनी शेजाऱ्यांना पार्टी दिली. या पार्टीमध्ये प्रेमा यांनी आपल्या सूनेला बहुमुल्य भेट देणार असल्याचे जाहीर करुन टाकले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेमा यांनी आपला वादा पूर्ण करत सूनेला होंडा सिटी कंपनीची महागडी कार भेट म्हणून दिली. सासूने दिलेल्या भेटवस्तूने सूनेच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला.
सूनेला मुलीप्रमाणे वागणूक दिली तरच स्रीभूण हत्येच्या प्रवृत्तीला आळा बसेल, अशी प्रेमा यांचे विचार आहेत. सून देखील कुणाची तरी मुलगी असते. त्यामुळे तिला आपल्या मुलीप्रमाणे वागणूक द्यायला हवी असे प्रेमा यांनी म्हटले आहे. आपल्या सासूच्या या विचारामुळे सून खुशबू हिने स्वत:ला सौभाग्यशाली मानत आहे.