Viral Video: भारतात लक्झरी कारची क्रेझ हळूहळू वाढत आहे. जगभरातून दरवर्षी हजारो लक्झरी कार इथे आयात केल्या जातात. एक लक्झरी, सुपरकार निर्माती कंपनी अशी आहे ; ज्या कंपनीच्या गाडयांना बाजारात चांगली मागणी आहे. कंपनीच्या कार्स खूप महागड्या आहेत. तरीदेखील या कंपनीच्या गाडयांसाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. ही कंपनी म्हणजे लॅम्बोर्गिनी (Lamborghini). लॅम्बोर्गिनी गाड्यांबाबत कारप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता राहिली आहे. तर आज एका भारतीय कारप्रेमीने लॅम्बोर्गिनीवर असणारे त्याचे प्रेम सिद्ध केलं आहे. त्याने होंडाची नवीन कार खरेदी करून त्याचे चक्क आलिशान लॅम्बोर्गिनीमध्ये रूपांतर केलं आहे.
भारतीय तरुणाने त्याच्या कामगिरीने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे. यूट्यूबर व गुजरातचा रहिवासी तन्ना धवल यांनी एका खास प्रोजेक्टसाठी नवीकोरी होंडा Civic 1.8 2008 मॉडेल खरेदी केली. होंडा Civic कार खरेदी करून त्याचा उपयोग आलिशान इटालियन लक्झरी कार लॅम्बोर्गिनीमध्ये रूपांतर करण्यासाठी केला आहे. त्याने अगदीच बारकाईने या कारचा अभ्यास केला आणि गाडीचे प्रत्येक फीचर्स लक्षात ठेवून लॅम्बोर्गिनी कारची रचना केली आहे. होंडा Civic कारचे लॅम्बोर्गिनीमध्ये केलेलं रूपांतर एकदा व्हिडीओत पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
होंडा Civic चे इंजिन आणि ॲक्सेसरीजचा वापर, इतर पार्ट्स सोर्स करून पिवळी ‘लॅम्बोर्गिनी’ तयार केली. लॅम्बोर्गिनीच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून बनवलेल्या या कारचे कामगार शुल्क वगळून, मेटल फ्रेम किंवा कारच्या चेसिसची किंमत एक लाखांपेक्षा जास्त आहे. कामगारांचा खर्च सुमारे तीन लाख रुपये, ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्टची एकूण किंमत सुमारे १२.५ लाख रुपये आहे. तसेच तन्ना धवल म्हणाला की, लॅम्बोर्गिनीसारखी दिसणारी चाके मिळू शकली नाही याची खंत आहे. तसेच कारच्या बोनेटवर त्याने लॅम्बोर्गिनी स्टिकरचा लोगो बनवून चिकटवला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ यूट्यूबर तन्ना धवल याच्या अधिकृत @tannadhaval इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘लॅम्बोर्गिनी ही इटालियन कंपनी आहे. पण, या गाडीवर आपल्या भारताचा ध्वजही तिथे असायला हवा, असे म्हणत गाडीवर लावलेल्या भारत देशाचा तिरंगा व्हिडीओत दाखवतो. मी सर्व जुगाड वस्तूंचा उपयोग करून ही खास लॅम्बोर्गिनी बनवली आहे’; असे तो व्हिडीओत सांगताना दिसत आहे. तसेच धवलने ब्रिटीश रेसिंग ड्रायव्हर जॉर्ज रसेल यांना श्रद्धांजली म्हणून कारच्या मागील बाजूस “६३” स्टिकरदेखील जोडले आहे. कारमध्ये प्रत्यक्ष काचेऐवजी काळ्या फिल्मसह ॲक्रेलिक शीटचा वापर करण्यात आला आहे; जेणेकरून कारच्या खिडक्या कोणालाही उघडता येणार नाहीत.