रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून, आजच्या पाडव्याच्या मंगलमुहूर्तावर, येत्या काळात सादर होणार असलेल्या काही निवडक नाटय़प्रयोगांविषयी येथे माहिती देत आहोत. सध्या चालू असलेल्या काही नाटय़प्रयोगांचाही त्यात अपरिहार्य अंतर्भाव आहे. तत्पूर्वी थोडे स्मरण आधीच्या प्रयोगांचे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ‘तुझं नि माझं जमेना’ आणि ‘वेगळं व्हायचंय मला’ या दोन नाटकांचे प्रयोग सर्वत्र एकाच वेळी चालू होते. त्यामुळे प्रेक्षकांना कोण कुठले संवाद का म्हणतोय, हेच अनेकदा कळायचे नाही. शेवटी शेवटी तर ‘घोटभर पाणी’ या नाटकाचे प्रयोगही एका कंपनीने चालू केले. पण त्यातील भाषा आक्षेपार्ह असल्याने प्रेक्षकांनी ते नाटक पाडले. शेवटी शेवटी प्रेक्षक रोडावल्याने हे सारेच प्रयोग बंद करावे लागले. दोन वर्षांपूर्वी ‘अंमलदार’ हे नाटक नव्या संचात मुख्य रंगमंचावर सुरू झाले. या नाटकाची मुख्य नाटक कंपनी नागपूरची आहे (त्याआधी काही काळ ‘संशयकल्लोळ’मधील अर्धा अंक, त्याच तिकिटात, त्याच रंगमंचावर सादर झाला होता. ‘घोटभर पाणी’, ‘संशयकल्लोळ’ सादर करणारी नाटक कंपनी बारामतीची.). पण ‘अंमलदार’मधील काही पात्रांना विस्मरणाचा विकार असावा. कारण नाटकातील संवाद विसरून ‘छावा’ या नाटकातील संवादांची फेक ते अचानक करतात (‘छावा’ची मूळ नाटक कंपनी मुंबईची आहे.). त्यामुळे प्रेक्षक अचंबित होऊन त्यांच्या हातातील पॉपकॉर्न खाली घरंगळतात, असे आढळून आले आहे. तर, हे असो. येत्या काळात सादर व्हावयाच्या महत्त्वाच्या नाटकांपैकी ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाचा प्रयोग बहुधा खूपच रंगेल. कारण त्यातील कलावंत मुरब्बी आणि अनुभवी आहेत. ‘अंमलदार’ आणि ‘छावा’ या दोन नाटकांतील मंडळींनी मिळून हे नाटक बसवलेलं आहे. त्यामुळे नाटकाच्या शीर्षकास योग्य न्याय मिळेल व प्रेक्षकांचे पैसे वसूल होतील, यात शंका नसावी. ‘तीन पायांची शर्यत’मध्ये भूमिका न मिळालेला एक वजनदार अभिनेता ‘बारीक मी होणार’ आणि ‘साखर खाल्लेला माणूस’ या दोन नाटकांद्वारे रंगमंचावर उभा ठाकणार आहे. याचीही नाटक कंपनी नागपूरचीच. आणखी एक मातबर अभिनेता ‘सौजन्याची ऐशीतैशी’ हे नाटक सादर करणार आहे, पण ते एकपात्री असेल. हा अभिनेता मुळात ‘छावा’ नाटककर्त्यांच्या कंपनीत होता. मात्र आपल्याला सारखे विंगेतच उभे करतात, अशी तक्रार करून त्याने स्वत:ची नाटक कंपनी सुरू केली. याच्या नाटकात पाश्र्वसंगीत खूपच असते. त्यातही सारखे खट्टाक.. फटय़ाक असे आवाज असतात. दरम्यान, प्रेक्षकांसाठी एक दिवाळी खूशखबर. ‘अभिमन्यू’ नामक नाटकाची तिसरी घंटा लवकरच वाजणार आहे. त्यात मुख्य भूमिकेसाठीचा कलावंत प्रेक्षकांमधूनच निवडला जाणार आहे. चक्रव्यूहात अडकल्याचा अभिनय ज्या कुणाला उत्तम वठवता येत असेल त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सगळ्या नाटक कंपन्या मिळून हे नाटक सादर करणार आहेत. त्यामुळे ते बिगबजेट असणार हे नक्की. तेव्हा त्वरा करा. वेळ वाया दवडू नका. कुणास ठाऊक, तुम्हीही असाल उद्याचे ‘अभिमन्यू’.. आजच्यासारखेच..!