दुपारची निवांत वेळ आहे. गडावर साहेबांच्या खास खलबतखान्यात एक गुप्त बैठक सुरू आहे. तशी ती नेहमीच तेथे होत असते. साहेबांचा एकमेव विश्वासू साथीदार समोर बसला आहे. साहेब समोरच्या कागदावर काही तरी रेखाटत आहेत. चष्मा कपाळावर घेऊन, डोळे बारीक करून, मान किंचित तिरपी करून साहेबांनी हातातला कागद लांब धरला. ओठाबाहेर आलेले जिभेचे टोक आत घेतले आणि समाधानाने मान हलविली. मग काही तरी लिहून झोकदार सही ठोकली आणि समाधानाने साथीदाराकडे बघितले. एक व्यंगचित्र काढून पूर्ण झाले होते. आता बोलावयास हरकत नाही हे ओळखून साथीदार पुढे झुकला. कालच बैठक झाली होती. पक्षाला चैतन्य आणण्यासाठी असे काही तरी करावे लागणारच होते. युवराजांना, युवा नेतृत्वाला पक्षात सक्रिय केले पाहिजे, असे साथीदाराने सुचविले, तेव्हा सर्वानी केलेल्या जल्लोषामुळे साहेबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान साथीदारास आठवत होते. आज पुन्हा तो मुद्दा जोमाने मांडावयास हवा, असे ठरवून साथीदारानेच या गुप्त बैठकीची संधी साधली होती. साहेबांनी व्यंगचित्राचा कागद बाजूला ठेवला आणि साथीदाराने घसा खाकरला. कालच्या बैठकीत युवा नेतृत्वाचा ठराव मांडतानाचे शब्द आज मात्र, घशातून बाहेरच येत नव्हते. मग साहेबांनीच सुरुवात केली. ‘जेमतेम बारा वर्ष झाली आणि पक्षाला युवा नेतृत्वाची गरज आहे म्हणतोस?’.. साथीदाराच्या डोळ्यात नजर खुपसून साहेब म्हणाले. त्यांनी नकळत स्वत:च्या डोक्यावरून हात फिरविला.  आता साथीदाराचा चेहरा पडला होता. ‘तसे नाही साहेब.. पण युवकांना पक्षाकडे आकर्षित करायचे असेल, पक्ष बांधायचा असेल, तर भरपूर वेळ देणारे नेतृत्व हवे.. तिकडे त्यांनीही तेच केलंय’.. वांद्रय़ाच्या दिशेने हात करून साथीदार बोलू लागला.. ‘त्यांचं युवा नेतृत्व आता काही तरी करूनही दाखवतंय.. त्यांच्या थोरल्या युवराजांनी प्लास्टिकबंदी करून दाखविली’.. नेमक्या याच वेळी साहेबांनी सिगरेटचा झुरका घेतला आणि अचानक त्यांना ठसका लागला.. काही क्षण थांबून साथीदार पुढे बोलू लागला. ‘आता तर त्यांचे धाकटे युवराजही काही करून दाखवायचं म्हणतायत’.. असे म्हणत साथीदाराने समोरच्याच एका वर्तमानपत्रावरले रंगीत खेकडय़ांचे फोटो साहेबांना दाखविले.. ‘युवा नेतृत्व असे काही तरी करून दाखवेल, तेव्हा आपल्या पक्षालाही चैतन्य येईल,’ साथीदार म्हणाला. ‘आणि तुम्हालाही आणखी मोकळा वेळ मिळेल’.. समोरच्या व्यंगचित्राच्या कागदाकडे पाहताना, असा विचार साथीदाराच्या मनात आला, पण ते शब्द गिळून जीभ चावत त्याने साहेबांकडे बघितले. साहेबांच्या डोळ्यात साथीदाराचे कौतुक मावत नव्हते.  हात वर करून साथीदारास संमती दिली.. साथीदार सुखावला. ‘आता कुणीही आम्हाला एकखांबी तंबू म्हणणार नाही!’.. तो मनातल्या मनात म्हणाला आणि युवा नेतृत्वाच्या जंगी स्वागताचा मेळावा कधी भरवायचा, याचा विचार करीत बाहेर पडला. त्याने फोन कानाला लावला.. गडाबाहेर चार-पाच युवकांनी जल्लोष सुरू केला. बातमी फुटली होती. साहेबांनी समाधानाने तोंड पुसून एक जोरदार झुरका मारत नवे व्यंगचित्र काढण्यासाठी  नवा कागद समोर ओढला..