25 September 2020

News Flash

त्यांसी आवरावे!

मुख्यमंत्रीसाहेब देवेंद्रमहाराज फडणवीस यांजवरी जबाबदारी तो बहुत खाशी येऊन ठेपली आहे.

उदयनराजे भोसले (संग्रहित छायाचित्र)

जलयुक्तशिवारप्रतिपालक वर्षांधिश्वर मंत्रालयाधीश श्रीमंत मुख्यमंत्रीसाहेब देवेंद्रमहाराज फडणवीस यांजवरी जबाबदारी तो बहुत खाशी येऊन ठेपली आहे. चंद्रपुराच्या अरण्यात बहुत दिनांपासोनी नक्सली मंडळी पुंडावा करून राहिलेली. त्यांस धडा थोर शिकविण्याचा विडा राजे देवेंद्रजी यांचे फौजेने उचललेला असता ते समयी त्या पुंडावेखोरांचे पुढारपण करण्याचा गंभीर इशारा मराठा दौलतीतून आला आहे. खुद्द हिजहायनेस महाराजसाहेब खासदार उदयनराजे भोसले सरकारांनी ही इशाऱ्याची तेजतर्रार तेग चालविली आहे. मराठय़ांस न्याय न मिळाल्यास प्रसंगी नक्सल्यांचे नेतृत्व करीन अशी सिंहगर्जनाच हिजहायनेसांनी केली आहे. काय तो प्रसंग वर्णावा? दक्षिणगंगेच्या तीरावर सकल मराठासागराच्या लाटाच्या लाटा येऊन आदळल्या. नाशकास पूर नवा नव्हे. दर पानकळा एक नवा महापूर घेवोनि येतोच तेथे. प्रंतु हा महापूर नव्हे, मूक सुनामीच होती ती. ती ओसरली नि हिजहायनेसांचा दरबार सुरू जाहला. पाठीशी परतत्या सुनामीची मूक गाज, समोरी मराठा दौलतीचे मानकरी व नाशकातील बूम व बोरूचे बहाद्दर. हिजहायनेसांच्या कानात अजूनही त्या सुनामीचा आक्रोश. त्या भरात ते कडाडले, खबरदार, माझ्या मराठय़ांवर अन्याय कराल तर! परिस्थिती बिघडता उद्रेकहोईल. लिबिया, सीरिया होईल. त्यांस न्याय द्या. अन्यथा आम्ही जातीने नक्सलवाद्यांचे नेतृत्व करण्यास जाऊ!! कर्णरंध्री शिशाचा रस ओतावा तसे ते तप्त शब्द येताच अनेकांच्या काळजातील पेसमेकर बंद पडले. अवघा सातपुडा थरारला. साताऱ्यातील जलमंदिराच्या देहाचे तो पाणीपाणी जाहले. नरिमन बिंदूपासोनी मलबार टेकडीपर्यंत सहा रिश्टर स्केलाचा धरणीकंप जाहला. त्यांचे मनी शंका निपजली, की खरोखरच हिजहायनेस त्यांची चारचाकी घेऊन सुसाट निघाले चंद्रपुरी, झारखंडी नेतृत्वाच्या मोहिमेकरिता, तर..? ऐसे होता मराठय़ांस आजवरी गहाळ जाहलेले आपले तारणहार गवसतील. ते म्हणतील, आजवरी हजारो कास्तकारांनी घेतली देहान्त प्रायश्चित्ते. काळ्या मातीनेच घेतला बळीराजाचा घास. शिक्षणसम्राटांच्या पायी अनेकांच्या फुटल्या पाटय़ा. सहकारी बँकांनी केल्या अनेकांच्या जप्त्या. तेव्हा कुठे होते हिजहायनेस, हा सवालच फजूल आहे. देरी जाहली त्यांस, प्रंतु ते हस्तप्रक्षालनास का होईना आले, हे थोर महत्त्वाचे. ऐसे होता मंत्रालयी तो पुनरपि अग्निप्रलयच होईल. त्याहूनी भयंकर म्हणजे हिजहायनेसांनास नक्सलसेनापती व्हावे लागेल. ते आधी रोखावयास हवे. नक्सल होणे का सोपे असते? त्याकरिता व्यवस्थेचे हितसंबंधी गडकोट सोडूनी लढय़ाच्या निबिड जंगलात उतरावे लागते. तेथे हिजहायनेसांची एसयूव्ही कैसी जाणार? ते कारणे वर्षांधिश्वरांस हे अतिरिक्तचे काम आता मानेवरी घ्यावेच लागणार. कां की सकल मराठय़ांचे न्याय-अन्यायाचे काय होईल ते पाहण्याकरिता सकल मराठा समाज समर्थ आहेच. त्या सुनामीच्या लाटांवरूनी मोर्चापर्यटन करणाऱ्या तारणहारांसी पाहण्याचे बलही सकल मराठा समाजाच्या बाहूंत आहेच. प्रंतु त्या लाटांवरी कोणी पेटते पलिते टाकत असतील तर त्याचे शमनाची जबाबदारीही का सकल मराठय़ांनीच घ्यावयाची? तो बरीक अन्यायच होईल!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 2:37 am

Web Title: udayanraje bhosale
Next Stories
1 पुसा बुरसटलेपणाची पुटे..
2 लोककल्याणमस्तु..
3 मा वृक्षेषु कदाचन..
Just Now!
X