कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा विचार करावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी ऊस परिषदेत दिला. आगामी हंगामात उसासाठी प्रतिटन ३३०० रुपये उचल देण्याची मागणी करतानाच शेतकऱ्यांना पावणे चारशे रुपये दर मिळवून देण्याचा निर्धार केला.
ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे झाली. परिषदेत शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनावर जोरदार टीका केली. साखर कारखानदारांची प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रशासनाने बैठक बोलावली. नाममात्र आश्वासन देऊन कारखान्यांची बोळवण केली. नीती आयोगाच्या माध्यमातून एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.




मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार
राजू शेट्टी यांच्या टीकेचा प्रखर रोख राज्यातील आघाडी सरकारवर राहीला. पावसात भिजत आणलेले आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील, या विश्वासाला तडा गेला आहे. महापुराने महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठची उस शेती पूर्णपणे खराब झाली आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. अशा आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा गंभीर विचार करावा लागेल. जो काही निर्णय होईल तो आता सरकारला माध्यमातूनच कळेल. यापुढे कोणत्याही नेत्याला भेटायला जाणार नाही. दिवाळीला मंत्र्यांना राज्यातील मंत्र्यांना काळे झेंडे दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.
३३०० रुपये उचल
गेल्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला १५० रूपये अंतिम देयक देण्यात यावे. यंदा उसाला ३३०० रूपये उचल देण्यात यावी. त्यातून विनाकपात एकरकमी एफआरपी देऊन मार्च पर्यंत उर्वरीत रक्कम द्यावी. हंगाम संपल्यानंतर साखरेच्या दराची अंतिम दराची मागणी केली जाईल,अशी मागणी शेट्टी केली. शेतकऱ्यांनी साथ दिली तर या हंगामात पावणे चार हजार रुपये दर मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला.