नवी दिल्ली : दुलीप करंडक आणि इराणी चषक या स्पर्धाचा आगामी देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकात समावेश करण्यात आल्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी घोषणा केली. तसेच प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला १३ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

‘‘दुलीप करंडक स्पर्धेसह पूर्ण स्वरूपातील देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होणार असून इराणी चषक स्पर्धेचेही पुनरागमन झाले आहे. दुलीप करंडक स्पर्धा ८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत सहा विभागांमध्ये (उत्तर, दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व आणि ईशान्य) बाद फेरीच्या स्वरूपात खेळवण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह म्हणाले.

दुलीप करंडक स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन या तीन संघांमध्ये खेळवण्यात येत होती; परंतु ‘बीसीसीआय’ने आता ही स्पर्धा पूर्वीच्या विभागीय स्वरूपात खेळवण्याचे ठरवले असून यंदा ईशान्य या सहाव्या विभागाचाही या समावेश करण्यात आला आहे.

तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर, २०२०मध्ये रणजी करंडक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. गेल्या हंगामात रणजी स्पर्धा मर्यादित स्वरूपात झाली होती. यंदा मात्र ही स्पर्धा पूर्ण स्वरूपात होणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. एलिट गटामध्ये ३२ संघांना चार गटांमध्ये विभागण्यात येईल. प्रत्येक संघ साखळी फेरीत सात सामने खेळेल. चारही गटांतील अव्वल दोन संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेल. दुसरीकडे, प्लेट गटात सहा संघांचा समावेश असून ते १५ साखळी सामने खेळतील. अव्वल चार संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 

त्याचप्रमाणे सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर, तर विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. या दोन्ही स्पर्धामध्ये ३८ संघांना प्रत्येकी आठप्रमाणे तीन गटांत आणि प्रत्येकी सातप्रमाणे दोन गटांत विभागण्यात येईल.