सुमनचं ते पत्र वाचून विद्याला वाईट वाटलं. जिला मनापासून काही करायची इच्छा आहे, तिला या पुरुषी समाजाने दाबून टाकली. या समाजव्यवस्थेची तिला चिडही आली.
आता यांना प्रतिकार करण्यासाठी आपल्यालाच कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत, असं तिला मनापासून वाटायला लागलं. म्हणून तर रात्री जेव्हा प्रकाशने पुन्हा तोच विषय काढला, तेव्हा कसलेही आढेवेढे न घेता,
 ‘‘माझा निर्णय मी उद्या संध्याकाळी सांगते. आता काही विचारू नका.’’  
असं म्हणून ती शांत बसली.
प्रकाशलाही आता गोडीगुलाबीनंचं घ्यायचं होतं. म्हणून तोही उद्याच्या संध्याकाळची वाट पाहत बसला.
दुसऱया दिवशी अलकाने रोहिदासला, त्याच्या युवक मंडळातील काही तरुणांना, नंदाला, ग्रामपंचायत सदस्य असलेल्या दुसऱया दोन स्त्रियांना अशा सात-आठ जणांना आपल्या घरी बोलावून घेतलं. विद्याने एकत्र यायला सांगितलं म्हणून सगळे आलेसुद्धा.
सुरुवातीलाच विद्याने त्यांना एकत्र बोलविण्याचा हेतू सांगितला. म्हणाली,
‘‘तुम्हाला सर्वांना एकत्र बोलवण्याचे कारण म्हणजे गेली दीड-दोन वर्षे आपण गावाच्या विकासासाठी एकत्र काम करतोय. गाव साक्षर करण्यासारखं मोठं काम आपण एकजुटीमुळे करू शकलो. अजूनही आपल्याला बरीच कामं करायची आहेत. पण आपल्या हातात कसलीही सत्ता नसल्याने ती कामं करणं अवघड होऊन बसलंय. अलकासारख्या, नंदासारख्या स्त्रियांच्या हातात गावचा कारभार आला असला, तरी त्या दबावाखाली आहेत. म्हणजे थोडेफार अधिकार असले तरी ते नसल्यासारखेच.’’
‘‘आणि आता तर आपण त्यांच्या डोळ्यावरच आलो आहे. म्हणजे इथून पुढे त्यांच्या हाती सत्ता राहिली तर आपल्याला कोणतीच कामे करता येणार नाहीत.’’
सत्ता त्यांच्या हाती राहिल्याने पुढे काय होईल, याची शक्यता रोहिदासने व्यक्त केली. तशी विद्या झटदिशी बोलून गेली.
‘‘म्हणून तर ती सत्ता आपण आपल्याकडे घ्यायची.’’
विद्याच्या या वाक्याने सगळे मूकपणे एकटक विद्याकडे पाहायला लागले. विद्या कोंडलेला श्वास सोडत हळू आवाजात म्हणाली,
‘‘तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असेल तर मी निवडणुकीला उभी राहायला तयार आहे.’’
विद्याच्या याच निर्णयाची सगळे वाट पाहात होते. अलकाच्या आनंदाला तर पारच राहिला नाही. न राहून ती सगळ्यांमधून उठली. अगदी हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला. आणि भाषण करावं तशी म्हणाली,
‘‘विधानसभा निवडणुकीसाठी विद्याताई जाधव यांना आमच्या जामगावच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा आहे.’’
अलकाच्या या खेळीमेळीच्या बोलण्याला सगळे हसले.
विद्यालाही सगळ्यांचा उत्साह पाहून बरं वाटलं. पण आता नुसताच हा निर्णय घेऊन थांबायचं नव्हतं, तर पुढच्या तयारीला लागायला पाहिजे होतं. त्या संदर्भात  ती काही बोलणार तेच रोहिदास म्हणाला,
‘‘आमच्या युवक मंडळाचे कार्यकर्ते तर असतीलच, पण निवडणूक होईपर्यंत आपल्या सर्वच माणसांनी असं एकत्र राहणं गरजेचं आहे. कारण पार्टीचं तिकीट मिळवायचं म्हणजे आपल्या पाठीमागं किती लोकं आहेत ते दाखवणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला प्रकाशचीही चांगली मदत होईल. शिवाय तो अनेक वर्षे पार्टीसाठी कामही करत आहे, तेव्हा तिकीट आपल्यालाच मिळेल अशी आशा आहे.’’
मग सगळ्यांनीच निवडणूक होईपर्यंत वेळ देण्याचं कबूल केलं आणि राष्ट्रीय लोकसंघ पार्टीचं तिकीट आपल्यालाच मिळणार या आत्मविश्वासाने प्रचाराचा नारळ फोडण्याची तारीखही पक्की केली.

खरं तर निवडणूक जिंकायची म्हणजे काही माणसं दावणीलाच बांधावी लागतात. पाहिजे तेव्हा, पाहिजे त्यावेळी त्यांना सोडता येतात. आणि कामं झाली की पुन्हा बांधता येतात. थोडा घास टाकला की अशी माणंसही आता भरपूर मिळतात. अण्णासाहेब मोहिते घडले ते त्यांनी आपली दावण अशी कायम भरलेली ठेवली म्हणूनच.
असं असताना आपल्या कार्यकर्त्यांच्या सवडीनुसार मिळणारा थोडाथोडा वेळ घेऊन विद्या निवडणूक कशी लढवणार?
गावपातळीवरची ग्रामपंचायतीची निवडणूक आणि आमदारकीची निवडणूक, केवढा फरक! पण विद्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवावी तशी थोडाथोडा वेळ देऊन आमदारकीची निवडणूक लढावयाला निघाली आहे. यात जय-पराजय या अजून लांबच्या गोष्टी आहेत, पण त्यासाठी लागणाऱया पूर्वतयारीचीही कल्पना अजून तिला नाही. आणि तिच्या कार्यकर्त्यांना तर त्याचा गंधही नाही. अशा अवस्थेतही राजकारणात मुरलेल्या अण्णासाहेबांच्या उमेदवारापुढं टिकाव धरणं अवघडच.
पण इथं प्रकाश विद्याच्या पाठीशी उभा राहिला. वाट दाखवणारा मिळाला, आता मागच्यांना फक्त पाय उचलायचे होते.
तालुक्यात झालेलं विद्याचं नाव, कार्यकर्त्यांमधील चर्चा या गोष्टींमुळे सत्ता आपल्याच घरात येण्याची चिन्हं प्रकाशला दिसू लागली आणि तोही मोठय़ा जोमाने कामाला लागला.
पार्टीचं तिकीट मिळविण्यासाठी तालुक्यातून पाच-सहा ट्रक माणसं पार्टी कार्यालयावर नेली. माणसांच्या, गाडय़ांच्याबाबतीत आपली बाजू अण्णासाहेबांच्या समोर कमी दिसून दिली नाही. निवडणुकीत या वरकरणी रूपाला फार महत्त्व. प्रकाश ते जाणत असल्याने त्याने त्यात कुठेही कुचराई केली नाही. आणि त्यामुळे विद्याला पार्टीचं तिकीट अगदी सहज मिळालं.
विद्याला मात्र प्रकाशच्या या वारेमाप खर्चाचं कोडं पडत होतं. ती जवळ चार पैसे नसतानाही केवळ प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीला उभी राहिली होती.
प्रकाश व्यवहारी होता. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे सर्व व्यवहार तो चोख पार पाडत होता. रोहिदास, अलका, नंदा यांसारख्या कार्यकर्त्यांचा आवश्यक तेथे धूर्तपणाने चांगला उपयोग करून घेत होता.
मात्र विद्याला प्रकाशची ही राजनीती पटणारी नव्हती. पण निवडणूक जिंकायची म्हणजे असं वागावंच लागतं हे सुद्धा ती अलीकडे जाणायला लागली होती. म्हणून तर सर्व गोष्टी खटकत असतानाही तिनं प्रकाशला कोणत्याच बाबतीत अडवलं नाही. मात्र निवडणुकीसाठी तो ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे घेत आहे, त्यांना निवडून आल्यानंतर कसली कामं करण्याची आश्वासनं देत आहे, याचं कोडं तिला पडलंच होतं.

(क्रमश:)

– बबन मिंडे