26 May 2020

News Flash

एमपीएससी (पूर्वपरीक्षा) : स्थानिक स्वराज्य संस्था

मित्रांनो, राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था हा महत्त्वाचा घटक आहे.

| March 9, 2015 02:10 am

मित्रांनो, राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकांतर्गत पंचायत राज्य, त्यासंबंधित केंद्राच्या व महाराष्ट्राच्या विविध समित्या, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेचे कार्य, तिची रचना, त्यासंबंधित विविध अधिकारी तसेच पंचायत समिती, पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी इत्यादी. तसेच ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा सरपंच, उपसरपंच, ७३ वी घटनादुरुस्ती इत्यादींचा अभ्यास करावा.

महत्त्वाच्या समित्या :
बलवंतराय मेहता समिती : ग्रामीण समाजाचा सर्वागीण विकास करण्यासाठी समाजविकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय विस्तार सेवा इ. कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अपेक्षित यश न मिळू शकल्याने केंद्र सरकारने बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्ती केली. यालाच ‘बलवंतराय मेहता समिती’ असे म्हणतात.
बलवंतराय मेहता समितीची नियुक्ती- १६ जाने. १९५७. समितीने आपला अहवाल सादर केला- २४ नोव्हेंबर, १९५७. राष्ट्रीय विकास मंडळाच्या बठकीनंतर १२ जाने. १९५८ रोजी शिफारसींना मान्यता.
प्रमुख शिफारसी- १. गाव स्तरावर ग्रामपंचायत, गट स्तरावर पंचायत समिती व जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद अशा प्रकारच्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती करावी.
२. राज्य सरकारच्या खालच्या स्तरावर सत्तेचे आणि जबाबदारीचे विकेंद्रीकरण करून ‘पंचायत राज’कडे सत्ता आणि जबाबदारी यांचे हस्तांतरण करावे.
बलवंतराय मेहता समितीने जी त्रिस्तरीय व्यवस्था सुचविली होती त्यालाच ‘पंचायत राज’ म्हणून ओळखले जाते. ‘पंचायत राज’चे स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान होते. त्यानंतर आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्याने स्वीकार केला. महाराष्ट्र राज्य हे पंचायत राजचे स्वीकार करणारे नववे राज्य ठरले.
* वसंतराव नाईक समिती : १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसी महाराष्ट्रात कशा प्रकारे अमलात आणल्या जातील यासाठी सरकारने २७ जून १९६० रोजी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. २२६ शिफारशी असलेला आपला अहवाल वसंतराव नाईक समितीने २५ मार्च १९६१ रोजी सरकारला सादर केला.
महत्त्वाच्या शिफारसी : गाव स्तरावर ग्रामपंचायत, गट स्तरावर पंचायत समिती व जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. वसंतराव नाईक समितीने सादर केलेल्या शिफारसींचा आधार घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ तयार केला. या अधिनियमाद्वारे १ मे १९६२ पासून ‘पंचायत राज व्यवस्था’ सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ असतानादेखील ग्रामपंचायतीच्या संदर्भात आपण मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९६१ चा आधार घेतो. असे का?
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ या अधिनियमाद्वारे पंचायत राजची स्थापना झाली. मात्र, यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या संबंधीच्या तरतुदी आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबई राज्यात ग्रामपंचायतींकरता ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ हा १९५८ मध्ये करण्यात आला. या अधिनियमात ग्रामपंचायतीसाठी सविस्तर तरतुदी आहेत, म्हणून ग्रामपंचायतीसाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याची गरज भासली नाही.
ल. ना. बोंगिरवार समिती : पंचायत राजच्या कारभारांचा अभ्यास करून त्यात काही त्रुटी आहेत का, हे पाहण्यासाठी राज्य सरकारने ल. ना. बोंगिरवार ही समिती २ एप्रिल, १९७० रोजी स्थापन केली. पंचायत राज व्यवस्था अजून प्रभावी करण्यासाठी दुर्बल घटकांना समाविष्टित करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित कराव, असे मत बोंगिरवार समितीने व्यक्त केले.
बाबुराव काळे उपसमिती : राज्य सरकारमध्ये बाबुराव काळे यांच्याकडे ग्राम विकास हे खाते होते. पंचायत राजपुढील कोणते प्रश्न आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी १९८० साली ही उपसमिती नियुक्त करण्यात आली.
शिफारस : जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या अनुदानात राज्य सरकारने वाढ करावी आणि या संस्था आर्थिकदृष्टय़ा संपन्न कशा होतील यासाठी प्रयत्न करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2015 2:10 am

Web Title: mpsc 7
टॅग Mpsc 2,Upsc
Next Stories
1 यूपीएससी
2 एमपीएससी
3 यूपीएससी : सीसॅट पेपर- २
Just Now!
X