24 September 2020

News Flash

बहिणाबाईंच्या गाण्याचे दिवस

शेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं.

बहिणाबाईंच्या कवितेतील अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वानांनाही लाजवेल असं तत्त्वज्ञान वाचून मी थक्क होऊन गेले. त्या दर्जेदार काव्याला यशवंत देवांनीसुद्धा आपल्या संगीताने पुरेपूर न्याय दिला. अस्सल मराठी मातीतून जसं काव्य आलं, तसा अस्सल मराठी मातीचा सुगंध संगीतातूनही दरवळला. त्यात वसंतरावांचं सुरेख दिग्दर्शन, भक्तीचा भावस्पर्शी अभिनय! त्यामुळे ज्या दिवशी त्याचं ‘दूरदर्शन’वरून प्रक्षेपण झालं, त्या वेळी लोकांनी, त्या लघुपटाला, गाण्यांना डोक्यावर घेतलं.
माझ्यासाठी १९७९ वर्ष खूप आनंदाचं ठरलं! त्या वर्षी मी गायलेल्या ‘हळदी कुंकू’ या चित्रपटासाठी मला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पाश्र्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. आणि ‘सूरसिंगार’चा ‘मिया तानसेन पुरस्कार’ हा त्याच चित्रपटातल्या शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्याला मिळाला. करिअरच्या सुरुवातीचे हे पुरस्कार असल्यामुळे मला त्याचं विशेष अप्रूप होतं!

त्याच वर्षी एके दिवशी माझे गुरू यशवंत देव यांचा फोन आला. ‘‘जरा घरी येऊन जा, कवयित्री बहिणाबाईंवर एक लघुपट करायचाय, त्यातल्या गाण्यांविषयी बोलायचंय.’’ मी ताबडतोब त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी प्रसिद्ध निर्माते/ दिग्दर्शक वसंत जोगळेकर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुमती जोगळेकर आल्या होत्या. देवांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनावर, त्यांच्या कवितांवर ‘दूरदर्शन’साठी एक लघुपट दोन भागांत बनवत होते. त्यात लहानपणच्या बहिणाबाईंसाठी दोन गाणी होती. त्याबद्दलच त्यांनी मला विचारलं होतं. बहिणाबाईंची भूमिका भक्ती बर्वे करणार होती. एकेका भागात आठ अशी दोन भागांत मिळून १६ गाणी होती. लघुपटात एकही संवाद नव्हता. एवढय़ा मोठय़ा लोकांबरोबर काम करायला मिळणार या आनंदात मी होते. मग देवांनी माझ्या दोन गाण्यांची तालीम घ्यायला सुरुवात केली. ही गाणी अहिराणी भाषेत होती. पण काही शब्दांचे उच्चार मात्र वेगळेच होते. ते उच्चार देवांनी मला शिकवले. त्याचे अर्थ सांगितले.

शेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं. रेकॉर्डिग रूममध्ये वसंतराव, सुमतीबाई, यशवंत देव, बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी, भक्ती, डॉ. काशिनाथ घाणेकर अशी बडी मंडळी बसली होती. मी रेकॉर्डिग रूममधून आर्टिस्ट रूमकडे निघाले असता डॉ. काशिनाथ घाणेकर मागोमाग आले. आणि म्हणाले, ‘‘उत्तरा, ही दोन गाणी तुला मिळाल्येत ना, ती छान गा. उरलेली चौदा गाणी कदाचित एका मोठय़ा गायिकेकडून घ्यायचं ठरलंय, पण काय सांगावं? चांगली गायलीस तर उरलेली सगळी गाणी तुलाच मिळतील.’’ मी हसून मान हलवली. आणि ती दोन गाणी गायले. सर्वाना गाणी आवडली.

त्यानंतर काही दिवसांतच देवांचा मला फोन आला, की आता उरलेली सर्व गाणीही तूच गाणार आहेस! दोन गाणी झाली. आता आणखी सहा गाणी करू, आणि नंतर दुसऱ्या भागात उरलेली आठ गाणी करू. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. पण आता चांगलं गाण्याची जबाबदारी माझ्यावर होती! कवी सोपानदेवांनी रेकॉर्डिगच्या वेळी मला बहिणाबाईंच्या कवितांचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं, ते मी लागलीच वाचून काढलं, जराही न शिकलेल्या, शेतावर काम करता करता, जात्यावर दळता दळता त्यांनी या कविता अगदी सहजपणे केल्या होत्या. त्यातली अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वान पंडितांनाही लाजवेल असं तत्त्वज्ञान वाचून मी थक्क होऊन गेले. जात्यावरच्या कवितेत त्या म्हणतात, ‘अरे जोडता तोडलं, त्याले नातं म्हनू नही, ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही.’ मरणावर भाष्य करताना त्या म्हणतात, ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं मरनं एका श्वासाचं अंतर,’ एका कवितेत माहेरचं वर्णन करताना, एक योगी त्यांना विचारतो, की इतकं माहेरचं वर्णन करतेस, तर मग सासरी आलीसच कशाला? त्यावर बहिणाबाई म्हणतात, ‘दे दे दे रे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’. माणसाच्या मतलबीपणावर बोट ठेवताना त्या म्हणतात, ‘पाहीसनी रे लोकांचं यवहार खोटे नाटे, तव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे’. एवढय़ा दर्जेदार काव्याला यशवंत देवांनीसुद्धा आपल्या संगीताने पुरेपूर न्याय दिला. एकाच मीटरमध्ये सर्व कविता असूनसुद्धा देवांनी संगीतातल्या विविधतेने त्यांना नटवलं. अस्सल मराठी मातीतून जसं काव्य आलं, तसा अस्सल मराठी मातीचा सुगंध संगीतातूनसुद्धा दरवळला. त्यात वसंतरावांचं सुरेख दिग्दर्शन, भक्तीचा भावस्पर्शी अभिनय! त्यामुळे ज्या दिवशी त्याचं ‘दूरदर्शन’वरून प्रक्षेपण झालं, त्या वेळी लोकांनी त्या लघुपटाला, गाण्यांना डोक्यावर घेतलं, संवाद नसूनही फक्त गाण्यांवरचा अभिनयसुद्धा लोकांनी पसंत केला. एक दर्जेदार काव्य गायल्याचं मनाला खूप समाधान मिळालं. परत काही महिन्यांनंतर दुसऱ्या भागातल्या आठ गाण्यांचं रेकॉर्डिग झालं. मग शूटिंग, आणि त्यानंतर १९८१ मध्ये दुसरा भाग ‘दूरदर्शन’कडून प्रसारित झाला. या भागालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. मग मला कार्यक्रमांमधून, ‘खोपा’, ‘बरा संसार’, ‘माझी माय’, अशा गाण्यांची फर्माईश होऊ लागली. ग्रंथाली, मुंबई मराठी ग्रंथसंगहालय यांनी माझे फक्त बहिणाबाईंच्या गाण्यावरचे कार्यक्रम ठेवले. एक कार्यक्रम तर पुण्याला टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणात झाला. त्याला साक्षात पु. ल. देशपांडे, सुनीताताई आणि नेते एस. एम. गोरे आले होते. देवांचे आणि माझे जे परदेशी कार्यक्रम झाले, त्यातही तिथले लोक बहिणाबाईंच्या गाण्यांची आवर्जून फर्माईश करू लागले. रेकॉर्डिगबरोबर कार्यक्रमसुद्धा वाढले.

८१ सालानंतर ४/५ वर्षे उलटली. लोकांचे फोन येत, की बहिणाबाईंच्या गाण्यांची कॅसेट कुठे मिळेल? पण त्याची कॅसेट निघालीच नव्हती. ८६ उजाडलं आणि माझं ‘बिलनशी नागिन निगाली’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्याच्या ‘व्हीनस’ कंपनीच्या लाखो कॅसेट्स खपल्या. मग वेगवेगळ्या कंपन्या माझ्याकडे, त्याच त्याच प्रकारच्या म्हणजे कोळीगीतं, लोकगीतं, लग्नगीतं अशा गाण्यांच्या कॅसेट्ससाठी विचारणा करू लागल्या. हे सर्व मी गात होते, त्यातून नाव, पैसा, कीर्ती, प्रसिद्धी सर्व मिळत होतं. मात्र मानसिक समाधान मला आणि विश्राम, आम्हा दोघांनाही नव्हतं! बरं, हे रेकॉर्डिग मी सोडूही शकत नव्हते. नवऱ्याला वाटे, मी काव्याच्या दृष्टीने चांगलं, दर्जेदार असं काहीतरी गावं! मग एके दिवशी त्याने मला विचारलं, ‘तुझी बहिणाबाईची गाणी चांगली आणि प्रसिद्धही आहेत. लोकही तुला त्याच्या कॅसेटबद्दल विचारतात.

तू इतक्या कंपन्यांसाठी गातेस, तर एखाद्या कंपनीला कॅसेट काढण्यासाठी विचार ना! मी ४/५ कंपन्यांना विचारलंही, पण कंपनीचे मालक बिगरमराठी असल्याने एकाही कंपनीला हे प्रोजेक्ट कमर्शियली यशस्वी होईल असं वाटलं नाही. शेवटी नवऱ्याने, विश्रामने ही कॅसेट स्वत:च काढायची ठरवली. मी म्हटलं, ‘अरे तुझा बिझनेस सांभाळून तुला हे कसं झेपणार? अगदी रेकॉर्डिगपासून ते बाजारात विक्रीला नेईपर्यंत, त्या कॅसेटबाबतच सारं तुलाच करावं लागेल. डबल कॅसेट असल्याने खर्चही डबल होईल,’ पण नवऱ्याने म्हटले, ‘काळजी करू नकोस, मी मार्केटचा, इतर टेक्निकल गोष्टींचा, सेल्स टॅक्सचा सर्व अभ्यास करून ही कॅसेट काढीन.’ आणि खरोखरच विश्रामने अथक परिश्रम करून ही कॅसेट काढली. रेकॉर्डिग करणं सोपं होतं. कारण वादक, अरेंजर (अप्पा वढावकर) आणि संगीत दिग्दर्शक सर्व ओळखीचे होते. देवांनंी प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळं निवेदन लिहून दिलं होतं. अप्पाने सर्व म्यूझिक ट्रॅक केले. ट्रॅक तयार झाल्यावर १६ ही गण्यांचं डबिंग मी ‘रेडिओवाणी’ या स्टुडिओत करत होते. आणि त्यांच्याच दुसऱ्या बाजूच्या स्टुडिओत भक्ती निवेदनाचं रेकॉर्डिग करत होती. यशवंत देव आम्हाला दोघांनाही मार्गदर्शन करत, दोन्ही स्टुडिओत सारखी येण्याजाण्याची कसरत करत होते. त्या दिवशी सकाळी भक्तीला, पुण्यात असलेले तिचे वडील गंभीर आजारी असल्याचा फोन आला आणि दुपारी ते गेले! भक्तीला हे कळूनसुद्धा तिने रेकॉर्डिग पुरं केलं. आहे की नाही कमाल भक्तीची!
सर्व १६ गाण्यांचं रेकॉर्डिग छान पार पडलं. मग ब्लँक कॅसेट विकत घेणे, वर मजकूर छापणे, गण्यांच्या कॉपीज काढणे, इनले कार्ड तयार करणे, हिशेब ठेवणे, महाराष्ट्रासाठी डिस्ट्रिब्युटर्स नेमणे, जाहिरात करणे, सेल्स टॅक्सची बाजू बघणे इत्यादी सर्व सोपस्कार विश्रामने एकटय़ाने पार पाडले. शिवाय डबल कॅसेटबरोबर अहिराणी भाषेतल्या कठीण शब्दांचे अर्थ सांगणारी एक पुस्तिकाही विश्रामने तयार केली. ‘एमयूव्ही’ एंटरप्रायझेस (आमच्या तिघांची- मानसी, उत्तरा, विश्राम-आद्याक्षरे घेऊन) शिवाय एमयूव्ही म्हणजे ‘म्युझिकली अनफर्गेटेबल व्हर्सेस!’ असं कंपनीला छानसं नाव दिलं आणि मग १९८९ मध्ये सुधीर फडकेंना मुख्य पाहुणे म्हणून बोलवून दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये त्यांच्या हस्ते या डबल कॅसेटचं प्रकाशन छान पार पडलं.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमधून या कॅसेटबद्दल भरभरून लिहून आलं! सर्वच लोकांना, पत्रकारांना ही कॅसेट खूप आवडली. बाजारातला त्याचा खप बघून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकांचे मला फोन यायला लागले. ‘उत्तराजी ही कॅसेट आमच्या कंपनीतर्फे का नाही काढली? मी हसून म्हटले, ‘हीच कॅसेट काढण्यासाठी तर मी तुम्हाला विचारत होते. पण ती चालणार नाही असं तुम्हाला वाटलं. जवळजवळ दहा वर्षे ती कॅसेट खपत होती. विश्राम गेल्यावर मात्र ज्या वेळी बहिणाबाईंवरच्या गाण्यांचे राइट्स मी ‘सागरिका’ कंपनीला विकले, त्या वेळी चार कंपन्यांनी ते विकत घेण्याबद्दल मला विचारलं. ‘सागरिका’ कंपनीने ही बहिणाबाईंची गाणी सीडी स्वरूपात काढली आणि लोकांपर्यंत पोचवली.
माझं आणि विशेषत: विश्रामचं स्वप्न पूर्ण झालं!
संपर्क- ९८२१०७४१७३

– उत्तरा केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:12 am

Web Title: bahinabai chaudhari kavita
Next Stories
1 लावणीचे लावण्य
2 चंचल लक्ष्मी
3 प्रियंवदा
Just Now!
X