वसई: वाहने भाड्याने देण्याच्या नावाखाली १३७५ गुंतवणूकदारांची २० कोटी ६० लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी सुरेश कांदळकर व साथीदार सचिन तेटगुरे अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २४६ वाहने जप्त करण्यात आली आहे.

आरोपी सुरेश कांदळकर याने अनेक गुंतवणूकदारांकडून त्यांच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या व त्यामध्ये दरमहा ५५ ते ७५ हजार रुपये परतव्याचे आमिष दिले होते. यावर विश्वास बसावा म्हणून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करार करत होता. सुरवातीला त्याने काही गुंतवणूकदारांना परतावा दिला.मात्र नंतर पैसे देणे बंद करून तो गायब झाला. या फसवणुकीसंदर्भात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी पथके नियुक्त करून तपास सुरू केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे काशिमिरा पोलिसांनी मुख्य आरोपी सुरेश कांदळकर यासह त्याच्या साथीदार सचिन तेटगुरे यांना अटक केली आहे. चौकशी केली असताना या आरोपींनी १ हजार ३७५ गुंतवणूक दारांची २० कोटी ६० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करून २५ कोटी रुपयांची २४६ वाहने हस्तगत केली.तपासादरम्यान सुरेश कांदळकरविरुद्ध पूर्वीपासून आर्थिक फसवणूकीचे नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक, गुजरात भरूच अशा विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे, काशिमिरा पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

बनावट नावाने वावर

सुरेश कांदळकर या वाहन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून तो गुंतवणूक दारांना राजू राजीव जोशी असे बनावट नाव सांगून वावरत होता. मात्र पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासादरम्यान खरे नाव सुरेश कांदळकर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांना आवाहन

आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीची माहिती देवून त्याद्वारे आपणास भविष्यात अधिक पैशाचे प्रलोभन दाखवून गुंतविण्यास भाग पाडत असल्यास सदरबाबत आपली आर्थिक फसवणुक होवु शकते याबाबत नागरिकांनी कोणतीही गुंतवणुक करताना आवश्यक कायदेशिर बाबीची खातरजमा करुनच गुंतवणूक करावी असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.