वसई: वादळी वाऱ्यामुळे वसई विरार शहरात महावितरणचे ४० ठिकाणी विजेचे खांब कोसळले.तर काही ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटून गेल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.त्याची दुरुस्ती करून हळूहळू वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जातो.वीज वितरण करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी विद्युत खांब उभे करून त्यावर वीज तारा विस्तारल्या आहे.
मागील दोन दिवसांपासून वसई विरार शहरात अवकाळी पावसा सह वादळी वारा सुरू आहे.वादळी वाऱ्याचा मोठा फटका महावितरणला बसला आहे.वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागात उच्चदाब वाहिनीचे १४ खांब व लघुदाब वाहिनीचे २७ खांब तसेच एक रोहित्र जमिनदोस्त झाले तर दोन रोहित्र नादुरुस्त झाले. विशेषतः अर्नाळा, नायगाव या भागात अधिक विजेचे नुकसान झाले असल्याचे महावितरणने सांगितले आहे.त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन सुमारे लाखो वीज ग्राहक बाधित झाले होते.
वीज कर्मचारी, ठेका कर्मचारी यांना सोबत घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम करवून घेतले जात आहे. जे काही बाकी आहे ते ही युद्धपातळीवर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
विजेविना नागरिकांचे हाल
वादळी वाऱ्यात विद्युत यंत्रणा कोलमडून गेल्याने वीज ग्राहकांचे चांगलेच हाल झाले आहेत. काही ठिकाणी एक ते दोन दिवस वीज उपलब्ध नसल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे चाळीस तासाहून अधिक वीज नसल्याने नागरिकांना विजे विना राहावे लागले असे वीज ग्राहक मनीष पाटील यांनी सांगितले आहे. विशेषतः वीज गेल्यानंतर त्यांची कोणतीही माहिती वीज ग्राहकांना देण्यात न आल्याने वीज ग्राहकांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.