लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मंजूर झालेल्या १० पूलांपैकी ८ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. महामार्गावर रस्ते ओलांडून प्रवास करताना घडणाऱ्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी १० पादचारी पूल तयार करण्यात येत आहेत. अन्य दोन पूल ही लवकरच पूर्ण केले जाणार आहेत.
मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर यासह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतच अनेक छोटे मोठे गाव पाडे आहेत. या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना महामार्ग ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागत होता. दिवसेंदिवस महामार्गावर मुंबईत – गुजरात अशा दोन्ही वाहिन्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. भरधाव वेगाने वाहने येत असल्याने रस्ते ओलांडून जाताना नागरिकांना व शाळकरी मुलांना अडचणी येत आहेत. काही वेळा रस्ते ओलांडून जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या धडका लागून अपघाताच्या घटना घडत असतात. काही जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर काही जणांना अपंगत्व आले आहे.
अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने महामार्गावर ज्या भागात गाव पाडे आहेत अशा ठिकाणी नागरिकांना ये जा करण्यास पादचारी पुलांची निर्मिती करावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वर्सोवा पूल ते पालघर या दरम्यान १० ठिकाणी पादचारी पूल उभारणीचे काम हाती घेतले होते. हे पूल ३५० ते ५०० मीटर लांबीचे असून प्रत्येक पुलासाठी साधारणपणे दीड कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे.
हे ८ पूल झाले पूर्ण
विरार, बावखळ टोकरेपाडा, वंगणपाडा नालासोपारा, शिवेचापाडा, ससूपाडा, वर्सोवा, दापचेरी, पारसी ढाबा, अवधनी अशा आठ ठिकाणी पादचारी पूल पूर्ण झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. तर कोल्ही चिंचोटी येथे काम प्रगतीपथावर आहे तर एका पुलांची जागा निश्चित झाल्यानंतर ते काम मार्गी लागेल असे चिटणीस यांनी सांगितले आहे.
धोकादायक प्रवास टळला
महामार्ग ओलांडून प्रवास करताना अगदी जीव मुठीत धरून जावे लागत होते. कोणती गाडी किती वेगाने येईल याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे कधी पुढे मागे करत धाव घ्यावी लागत होती. विशेषतः शाळकरी मुलांचे जास्त हाल होत होते. वाहने वेगाने येत असल्याने काही महामार्गाच्या दुभाजकाच्या मध्येच बराच वेळ अडकून राहावे लागत होते. आता पूल तयार झाल्याने नागरिकांची धोकादायक प्रवासातून सुटका झाली आहे.
महामार्ग प्राधिकरणाने आराखड्यात जे पादचारी पूल नियोजित केले होते. त्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. जे काही कामे प्रलंबित आहेत ती सुद्धा आम्ही लवकर मार्गी लावू. -सुहास चिटणीस, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण