भाईंदर :पाण्याच्या शोधात भाईंदरच्या घोडबंदर गावात शिरलेल्या एका जखमी हरणाची वनविभाग व मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार कसरून त्या हरणाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर परिसरात मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसले आहे.या महामार्गाच्या पलीकडे असलेले घोडबंदर हे गाव जंगलालगत असल्याने येथे वेळोवेळी वन्यप्राणी आढळून येत असतात.
मंगळवारी सायंकाळी घोडबंदर गावाच्या वेशीवर असलेल्या नाल्याजवळ एक हरण जखमी अवस्थेत पडलेले स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले होते. नागरिकांनी तात्काळ याची माहिती मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.घटनास्थळी अग्निशमन पथक दाखल झाले आणि वन विभागालाही याची माहिती देण्यात आली.
वन विभागाने तातडीने घटनास्थळी पथक पाठवले होते,या जखमी अवस्थेत हरणाला ताब्यात घेतले,रात्री उशिरा हरणावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले,अशी माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.
पाणवठे तयार करा
उन्हाळ्याच्या प्रारंभानंतर बिबटे, हरणे व इतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी वन विभागाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. वन्य प्राण्यांना जंगल परिसरातच पिण्याच्या पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणवठे तयार करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.