वसई: वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बसने प्रवास करणाऱ्याप्रवाशांना थांबण्यासाठी बस थांबे तयार केले आहेत. मात्र काही थांब्यांची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ होत आहे.
वसई पूर्वेच्या भागातून महामार्ग गेला आहे. या मार्गालगत अनेक छोटीमोठी गावे असून दररोज या महामार्गावरून मोठय़ा संख्येने प्रवासी हे महापालिका व एसटी महामंडळाच्या बसमधून ठाणे, मुंबई, वसई, विरार असा प्रवास करतात. या प्रवाशांना थांबण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी बस थांबे आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांची बिकट अवस्था आहे.
नायगाव पूर्वेच्या बापाने फाटा येथे बस थांबा तयार केला होता. त्या बस थांब्याच्या सभोवताली जप्त, बेवारस, अपघात ग्रस्त वाहने उभी ठेवण्यात आली आहेत. तर दुसरीकडे त्याच्या बसण्याच्या जागेची ही धूळधाण, घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. या थांब्यावर थांबता येत नसल्याचे प्रवाशांची सांगितले. त्यामुळे थेट मुख्य रस्त्यावरच बसची वाट पाहत उभे राहावे लागते. तसेच चिंचोटी येथील बस थांब्यावर बेकायदा टपऱ्या आहेत. त्याठिकाणी विविध साहित्य ठेवून त्यावर कब्जा केला असल्याचे चित्र आहे. बस थांबे दुर्लक्षित होत असल्याने त्यांची अवस्था आणखीनच बिकट होऊ लागली आहे.
‘थांब्यांकडे एसटीने लक्ष द्यावे’
एसटी महामंडळ यांच्यातर्फे जे बस थांबे आहेत त्यांची काही ठिकाणी अत्यंत बिकट अवस्था होत आहे. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर उभे राहता येत नाही. एसटीने सर्व थांब्याची ठिकाणे तपासून त्याठिकाणी आवश्यकतेनुसार सुधारणा करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
(महामार्गवर एसटीचे २० ते २५ थांबे आहेत. त्यांची सर्वांची तपासणी केली जाईल.ज्या ठिकाणी अतिRमण, दुरवस्था असे प्रकार झाले असतील त्यावर कारवाई केली जाणार आहे.
– राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक पालघर , एसटी महामंडळ