भाईंदर :- भाईंदरमध्ये गुरुवारी रात्री विद्युत वाहनांच्या शोरूमला आग लागल्याची घटना घडली. या आगीत १६ दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र दुचाकी जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भाईंदर पूर्व येथील कॅबिन रोड परिसरात एका दुचाकी विद्युत वाहनांच्या शोरूममध्ये गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. शोरूममधील एक वाहन चार्जिंगसाठी लावले असताना सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या बॅटरीला शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अचानक आग लागली.
त्या वेळी शोरूममध्ये कोणीही नसल्याने आग काही क्षणांतच पसरली. आगीचे लोट परिसरात उठू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली.अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत शोरूममधील १६ दुचाकी पूर्णतः जळून खाक झाल्या असून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.