भाईंदर : डास, दुर्गंधी आणि इतर समस्यांची भीती असल्यामुळे नागरिक बायोगॅस प्रकल्प उभारणीस विरोध करत आहेत. परिणामी, मागील चार वर्षांत आठ पैकी केवळ चार प्रकल्प महापालिकेला सुरु करता आले असल्याचे समोर आले आहे.

मिरा-भाईंदर शहरातून दररोज सुमारे ५५० टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे २०० टन ओला कचरा असतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात आठ ठिकाणी बायोमेथेनायझेशन प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या प्रकल्पांद्वारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून नैसर्गिक वायू तयार केला जातो. या प्रकल्पांसाठी एकूण ४५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला १६ कोटी ७७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून उर्वरित खर्च महापालिकेच्या निधीतून केला जात आहे.

मात्र, मागील चार वर्षांत प्रशासनाला केवळ चार प्रकल्प उभारण्यात यश आले आहे. उर्वरित चार ठिकाणी नागरी विरोधामुळे काम सुरु करण्यात अडचणी येत आहेत. या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता हे प्रकरण पेटण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन देखील ठोस भूमिका घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते.

मिरा-भाईंदर शहरात आठ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवघर येथील आरक्षण क्र. १२२ येथे दोन प्रकल्प, कनकिया येथील आरक्षण क्र. २७१ येथे एक प्रकल्प आणि भाईंदर पश्चिम येथील आरक्षण क्र. १३९ येथे एक असे एकूण चार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.तर महाजनवाडी आरक्षण क्रमांक ३६८, पेणकरपाडा आरक्षण क्रमांक ३५३ आणि तन्वी एमीनेन्ट्स परिसर आणि उत्तन घन कचरा प्रकल्प स्थळी नागरी विरोधामुळे प्रकल्प उभारणीचे काम रखडले असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.