वसई: विरारमधील नंदाखाल परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीजेसंबंधी विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा तक्रार करूनही या समस्यांवर तोडगा निघत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यलयावर आक्रोश मोर्चा पुकारला.

वसई विरार शहरात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पण गेल्या काही काळापासून महावितरणच्या अंतर्गत येणाऱ्या वटार विभागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वटार विभागात विरारमधील सातपाडा, नवापूर, वटार, कोफराड, राजोडी आणि नंदाखाल या भागांचा समावेश आहे. पण, मागील काही काळात सलग २ ते ३ दिवस वीज नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच या तीन चार ठिकाणी विजेचा पुरवठा नीट नसताना, आसपासच्या परिसरात मात्र वीजपुरवठा सुरळीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वटार विभागाकडे महावितरणकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तसेच वारंवार तक्रार करूनही या परिस्थितीत काहीच बदल न झाल्यामुळे शुक्रवारी (३ ऑक्टोबर) नंदाखाल संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वसई पूर्वेतील महावितरणच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नंदाखाल परिसरातील वीजपुरवठ्या संबंधित समस्यासह इतर विविध मागण्यांबाबत तक्रार पत्र महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याकडे सादर करण्यात आले.

या निवेदनात वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच नवे चेंज ओव्हर स्विच बसवणे, गावातील गंजलेली रोहित्र आणि वीजेचे खांब बदलणे, वीज वितरण व्यवस्था भूमीगत करणे, वटार विभागात मंजूर झालेले सबस्टेशन तातडीने सुरु करणे, इन्सुलिटेड कंडक्टर बंच पद्धतीऐवजी जुन्या पद्धतीने बसवणे, ग्राहकांना स्मार्ट मीटरऐवजी जुन्या पद्धतीचे मीटर बसवण्याची परवानगी देणे, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.

या मोर्चात जॉन परेरा, विन्सेंट परेरा, पायस मचाडो, डॉमिनिक रुमाव आणि रॉजर रोड्रिक्स यांनी मागणी निवेदन सादर केले. तर, यावेळी नंदाखाल चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक डिआब्रीओ, शाळेचे प्राचार्य फादर प्रदीप डाबरे, फादर विजय लोगो, सहाय्यक धर्मगुरू फादर ब्रायन-टायस हे देखील उपस्थित होते.