वसई: चर्चगेट- विरार महिला विशेष लोकलमध्ये दोन महिलांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीची चित्रफित शुक्रवारी समाजमाध्यवार वायरल झाली. मंगळवार १७ जून रोजी सायंकाळी मिरा रोड ते भाईंदर दरम्यान ही घटना घडली होती. यात एक महिला गंभीर जखमी झाली. मात्र कुणीही तक्रार न दिल्याने वसई रेल्वे पोलिसांनी केवळ स्टेशन डायरीत या घटनेची नोंद केली आहे.
कविता मेदाडकर (३१) या महिला विरारच्या फूलपाडा येथे राहते. मंगळवार १७ जून रोजी सायंकाळी तिने विरारला जाण्यासाठी मिरारोड रेल्वे स्थानकातून महिला लोकल पकडली होती. त्यावेळी दारात उभ्या अशलेल्या ज्योती सिंग (२१) या तरुणीसोबत तिचा वाद झाला. शाब्दीक वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी कविताच्या डोक्यात मोबाईल मारला. त्यामुळे कविताचे डोके फुटले आणि ती रक्तबंबाळ झाली.
याची माहिती रेल्वे सुरक्षा बला आणि रेल्वे पोलिसांना मिळताच भाईंदर स्थानकातून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस चौकीत नेण्यात आले. जखमी कविता मेदाडकर प्रथमोपचार करण्यात आले. या हाणामारीची चित्रफित शुक्रवारी समाजमाध्यमावर चांगलीच वायरल झाली. त्यामुळे ही घटना पुन्हा चर्चेत आली.कविता मेदाडकर ही महिला विरारच्या फुलपाडा येथे राहणारी तर ज्योती अयोध्या प्रसाद सिंह (२१) ही नायगावच्या गिरीजानगर जूचंद्र येथे राहणारी होती.
घटना आम्हाला कळताच भाईंदर रेल्वे स्थानकात त्यांना उतरवून, आमच्या पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ जखमी महिलेला उपचार केले. त्यानंतर त्यांना तक्रार देण्यासाठी विचारले तेव्हा त्यांनी नकार दिला. आम्ही त्याची नोंद घेऊन दोघींना समज देऊन त्यांना सोडले आहे.- भगवान डांगे , प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई लोहमार्ग पोलीस ठाणे वसई.